जळगाव : मनपा निवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार ए.टी. पाटील देखील मैदानात उतरणार आहेत. त्यासाठी लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान १ आॅगस्टपर्यंत सुट्टी घेणार असल्याची माहिती खासदार ए.टी. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.महापालिका निवडणुकीसाठी माघारीच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले असून सर्वच पक्ष जोरदार तयारी करीत आहेत. त्यात या निवडणुकीत भाजपाची धुरा संभाळणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे अधिकाधिक वेळ जळगावात देत आहेत. सोबतच पालकमंत्री चंंद्रकांत पाटील यांचेदेखील दोन दौरे झाले असून या वेळी ‘१७ मजली’ भाजपाच्या ताब्यात खेचण्याचा पुरेपूर प्रयत्न होताना दिसत आहे. त्यात आता खासदारांच्या मतदारसंघातील ही एकमेव महापालिका असल्याने खासदारदेखील या निवडणुकीत भाजपाच्या विजयासाठी जळगावात ठाण मांडून बसणार आहेत.या संदर्भात स्वत: खासदार पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, बुधवारपासून लोकसभेचे अधिवेशन सुरू होत असून त्यात ३१ महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होणार आहे. असे असले तरी आपल्या मतदार संघात महापालिका निवडणूक असल्याने तसे पत्र संसदीय कामकाज मंत्र्यांना देऊन सुट्टी घेणार आहे. त्यासाठी दिल्लीला जात असून सुट्टीची परवानगी मिळताच जळगावात येऊन प्रचारात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रत्येक प्रभागात फिरणारभाजपाच्या प्रत्येक उमेवारासोबत त्यांच्या प्रभागात फिरुन आपण प्रचार करणार असल्याची माहिती खासदार पाटील यांनी दिली. सभांना देखील उपस्थित राहणार असून पक्षाकडून जी जबाबदारी दिली जाईल, ती आपण पार पाडणार असल्याचे खासदार पाटील म्हणाले.