जळगाव : शहरात अनेक गणपती मंदिरे प्रसिद्ध असून, प्रत्येकाची स्थापनेमागील गोष्ट वेगळी आहे. गणेश कॉलनी परिसरात असलेल्या कृषी कॉलनीतील ‘नवसाचा गणपती’ हा मनातील इच्छा, आकांक्षा पूर्ण करणारा गणपती म्हणून भाविकांमध्ये ओळखला जातो. या मंदिरातील गणेश मूर्ती शोभना गंधे यांनी दिली आहे.
नवसाचा मंदिर गणपती ट्रस्टच्या अध्यक्षा सरस्वती पाटील यांनी मंदिराविषयी माहिती दिली. पिंप्राळा येथे गंधे यांचे गणपती मंदिर होते. काही कारणाने त्यांना मंदिराचे स्थलांतर करावे लागणार होते. त्यामुळे गणपतीची मूर्ती कोणाला द्यायची याच्या शोधात गंधे कुटुंबीय होते. काही जणांनी देणगी देऊन ही मूर्ती घेऊन जाण्याची इच्छा दर्शवली होती. मात्र, मूर्ती जळगावबाहेर देऊ नये, असा दृष्टांत शोभना गंधे यांना झाला. त्यानंतर त्यांनी नांदेडकर यांच्याशी संपर्क साधला. नांदेडकर यांनी कृषी कॉलनीचे चेअरमन टी. एस. पाटील यांना मंदिरासाठी गणेश मूर्ती स्वीकारण्यास इच्छुक आहात का, अशी विचारणा केली. त्यांनी संमती दिल्यावर शोभना गंधे यांनी १९९६ मध्ये पाटील यांच्याकडे मूर्ती सुपूर्द केली. मात्र, पुढील दोन वर्षे काही कारणाने मंदिर होऊ शकले नाही. १९९८ मध्ये मंदिर उभे राहून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. प्रसन्न व चैतन्यमय वातावरणात हे मंदिर आहे. नवसाला पावणारा, मनातील इच्छा, आकांशा पूर्ण करणारा गणपती म्हणून त्याची ख्याती आहे.
मूर्ती उचलणे झाले होते अशक्यमूर्ती आणल्यावर ती शेडमध्ये ठेवली होती. तेथून मंदिरातील चौथऱ्यावर ठेवायची होती. त्यासाठी आठ ते दहा जण आले होते. परंतु त्यांना ही मूर्ती उचलणे शक्य झाले नाही. टी. एस. पाटील यांनी मूर्तीकार राणा यांच्याकडील कारागीरांना बोलावून आणले. पाच जणांनी मिळून ही मूर्ती उचलली, अशी आठवण सरस्वती पाटील यांनी सांगितली. मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पाच ते सहा वर्षांपासून गणेशोत्सवात मंदिराच्या प्रांगणात गणपती बसवला जातो. त्यामध्ये तरुणांचा सक्रीय सहभाग असतो, असेही त्यांनी सांगितले.
गंधे यांनी या अटीवर दिली मूर्तीस्वातंत्र्य सैनिक दत्तात्रय गंधे यांना गणपतीचा दृष्टांत झाला होता. त्यांनी पिंप्राळा येथील जागेत गणपतीचे मंदिर स्थापन केले. या ठिकाणी दर अंगारकी व चतुर्थीला भाविकांची मोठी गर्दी व्हायची. कालांतराने काही कारणाने मंदिराच्या स्थलांतराचा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा शोभना दत्तात्रय गंधे यांनी मंदिरातील मूर्ती कृषी कॉलनीतील रहिवाशांना मंदिरासाठी म्हणून दिली. गंधे यांच्या गणपती मंदिराचे नाव ‘नवसाचा गणपती’ असे होते. तेच कायम ठेवावे, अशी अट टाकण्यात आली होती. त्यामुळे हे नाव पुढेही कायम राहिले, अशी माहिती योगेश्वर गंधे यांनी दिली.