सुनील पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या कंत्राटी भरतीत १०० गुण असणार आहेत. त्यातील तब्बल ८० गुण हे उमेदवाराच्याच हातातील असून २० गुण मौखिक चाचणीसाठी असणार आहे. ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. मौखिक चाचणीत विषयज्ञान, दृष्टीकोन, शारिरिक क्षमता, कर्तव्यनिष्ठा व आज्ञाधारकपणा इत्यादी घटकांची तपासणी होणार असल्याची माहिती महापालिकेच्या आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी दिली.
महानगरपालिकेतर्फे कनिष्ठ अभियंता (बांधकाम, पाणी पुरवठा व विद्युत), रचना सहायक, आरेखक, अग्निशमन फायरमन, विजतंत्री, वायरमन, आरोग्य निरीक्षक व टायपिस्ट (संगणक चालक) आदींचे ८६ पदे कंत्राटी पध्दतीने भरली जाणार आहेत. ३ ऑक्टोबरपासून अर्ज मागवायला सुरुवात झालेली आहेत. १३ ऑक्टोपर्यंत १ हजार ४५९ उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले आहेत. २० ऑक्टोबर शेवटची तारीख आहे.शहरातील उमेदवार असेल तर १० गुण असतील. जळगाव तालुक्यातील असेल तर ७, जिल्ह्यातील ५ व इतर जिल्ह्यातील असेल तर २ गुण मिळणार आहेत.
शैक्षणिक अर्हतेत ५० गुण मिळविणाऱ्यांमध्ये ८० टक्के व त्यापेक्षा जास्त गुण असलेल्याला ५० गुण मिळणार असून ७५ ते ७९ टक्के गुण प्राप्त करणाऱ्याला ४० गुण विहित असतील. ६० ते ७४ टक्के असलेल्याला ३० गुण, ५० ते ५९ टक्के असलेल्याला २० व ४० ते ४९ टक्के गुण असलेल्या उमेदवाराला १० गुण विहित करण्यात आले आहेत. शासकीय व निमशासकीय संस्थांकडीलच अनुभव प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे.