जळगाव : बुधवारी झालेल्या जोरदार पावसानंतर दुसºया दिवशीही, गुरुवारी दुपारी व संध्याकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे बळीराजादेखील सुखावला असून शेती कामाला वेग येणार असल्याचे चित्र आहे. सलग दुसºया दिवशी झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचल्याने वाहनधारकांसह पादचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे उकाडादेखील कमी झाला.गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या पावसाने बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जोरदार हजेरी लावली. त्यानंतर गुरुवारीदेखील चांगला पाऊस झाला. गुरुवारी सकाळी काही वेळ सूर्यदर्शन झाले. त्यानंतर ढगाळ वातावरण झाले व पुन्हा जोरदार पाऊस होईल, असे चित्र निर्माण झाले. मात्र सकाळी दहा वाजेपासून पुन्हा उन्हाचा चटका वाढला व उकाडाही असह्य झाला. मात्र दुपारी साडेतीन वाजता नभ दाटून आले व पावसाला सुरुवात झाली. त्या वेळी अवघ्या १५ ते २० मिनिटेच हा पाऊस झाला व पुन्हा उघडीप दिली. त्यानंतर मात्र संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. केवळ २० मिनिटे पडलेल्या या पावसाने मात्र मोठा दिलासा दिला. जोरदार पावसाने ठिकठिकाणी तळे साचले.जिल्हा क्रीडा संकूल, नवीपेठ, बी.जे. मार्केट परिसर, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यान, जिल्हा रुग्णालयासमोर, बजरंग बोगदा इत्यादी भागात पाणी साचले. ऐन संध्याकाळी बाजारपेठेत आलेल्यांसह घरी परतणारे विद्यार्थी, नोकरदार हेदेखील पावसात सापडले. अनेकांनी दुकान, रुग्णालय परिसर व वाटेत कोठेतरी थांबून पावसापासून बचाव केला. तर अनेकांनी ओले होतच घरी जाण्याचा निर्णय घेतला व पावसाचाही आनंद लुटला.रिपरिपने उकाडा झाला कमीदोन दिवस जोरदार पाऊस झाला तरी जमिनीतील उष्णता बाहेर येऊ लागल्याने उकाडा कायम होता. संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसानंतर साडेसात वाजेपासून पुन्हा रिपरिप पावसाला सुरुवात झाली. ही रिपरिप रात्रीपर्यंत सुरुच होती. या रिपरिपने मात्र वातावरणातील उकाडा कमी होण्यास मदत मिळाली व शहरवासीयांनाही दिलासा मिळाला.बळीराजाला दिलासापावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला दोन दिवस झालेल्या या जोरदार पावसाने दिलासा मिळाला आहे. चांगल्या पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र या पावसाने पेरणीला वेग येणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
जळगावात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊस, बळीराजा सुखावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:18 PM