लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसीय जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी शहरातील बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यासह नागरिकही घराबाहेर न पडल्याने शहरात सर्वत्र शुकशुकाट पहायला मिळाला. शहरात केवळ अत्यावश्यक सेवेतील मंडळी व प्रवासीच रस्त्यावर दिसत असल्याचे पहिल्या दिवशी चित्र होते. गेल्या वर्षीचा जनता कर्फ्यू व त्यानंतरचे कडक लॉकडाऊननंतर आता पुन्हा एकदा जळगाव शहर ठप्प झाले.
शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जळगाव महापालिका क्षेत्रात १२ ते १४ मार्च दरम्यान जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. अत्यावश्यक सेवेत दवाखाने व मेडिकल्स, शासकीय कार्यालये ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसह, दूध विक्री केंद्र तसेच कृषी क्षेत्रातील आस्थापना, गॅरेज अशा बाबींना या जनता कर्फ्यूत सूट देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या बाबींना प्रशासनाकडून सूट नसून कडक निर्बंध आहेत. यात गुरुवारी रात्री ८ वाजेपासून जनता कर्फ्यूला सुरुवात झाली. त्यानंतर शुक्रवारी पहिल्या दिवशी जनता कर्फ्यूला नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असल्याचे समाधानकारक चित्र पाहायला मिळाले.
किराणा दुकान बंदमुळे अधिक शुकशुकाट
लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेत किराणा दुकान सुरू ठेवण्यात आले होते. मात्र या वेळी तीन दिवसीय जनता कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवेतील किराणा मालासह भाजीपाला व फळे विक्रीवरही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे शुक्रवारी जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी बाजारपेठेतील किराणा दुकानही बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट पहायला मिळाला. जनता कर्फ्यूच्या अनुषंगाने प्रशासनाने आखून दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिक घरात थांबणे पसंत करीत असल्याचे चित्र आहे.
विनाकारण फिरणाऱ्यांना पाठविले घरी
जनता कर्फ्यूची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून शहरात पेट्रोलिंग सुरू आहे. ठिकठिकाणी फिक्स पॉईंट उभारण्यात आले आहेत. मुख्य चौकांमध्ये तपासणी सुरू आहे. पेट्रोलिंग दरम्यान काही ठिकाणी विनाकारण पायी फिरणारे नागरिक आढळून आल्याने त्यांना समज देऊन घरी पाठवण्यात येत होते. दुसरीकडे महापालिकेची सहा पथकेदेखील जनता कर्फ्यूच्या अंमलबजावणीसाठी तैनात करण्यात आली आहेत.