- अमित महाबळजळगाव - समाजकल्याण विभागामार्फत संचालित शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविली जाते. या योजनेतील सन २०२२-२३ वर्षातील पात्र लाभार्थींना निधीची प्रतीक्षा आहे. राज्य शासनाकडून १ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध न झाल्याने जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे.
इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरचे व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या; परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेले अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी जिल्हा मुख्यालय किंवा या मुख्यालयाच्या पाच कि.मी. परिघातील शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्याचा प्रवेश झालेला असणे आवश्यक आहे, अशीही एक अट आहे.
मिळणारे लाभ...स्वाधार योजनेत विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर सुविधांसाठी थेट अनुदान देण्यात येते. जळगाव शहरात समाजकल्याण विभागाची तीन वसतिगृहे असून, त्यापैकी दोन मुलांची, तर एक मुलांचे आहे. मुलांची दोन वसतिगृहे मिळून इमारत क्षमता १८० विद्यार्थ्यांची, तर मुलींच्या वसतिगृहाची क्षमता १०० विद्यार्थिनींची आहे.
२०२२-२३ मध्ये ५५४ विद्यार्थी पात्रशैक्षणिक सत्र २०२२-२३ मध्ये ५५४ विद्यार्थी योजनेसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी २२१ विद्यार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता देण्यात आला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना देय अनुदान देण्यासाठी राज्य सरकारकडून १ कोटी ७१ लाख रुपये मिळण्याची प्रतीक्षा आहे.
२०२३-२४ सत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहनसन २०२३-२४ शैक्षणिक सत्राच्या अर्ज प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. सहायक आयुक्त कार्यालय, महाबळ कॉलनी रस्ता, जळगाव या ठिकाणी योजनेचे अर्ज उपलब्ध आहेत. अर्जासोबत विद्यार्थ्यांनी भाडे कराराची प्रत, शेवटचा वर्ग उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका जोडण्यासह अर्जावर संपर्क क्रमांक नोंदविणे आवश्यक आहे.
वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा सुरूस्वाधार योजनेच्या निधीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे. निधी उपलब्ध होताच तो विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे अदा केला जाईल, अशी माहिती समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी दिली.