आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ३१ - एटीएम कार्डचा पीन क्रमांक जाणून घेत आॅनलाईन शॉपिंग करून तालुक्यातील वावडदा येथील गणेश देविदास कळसे या तरूणाची पन्नास हजारात फसवणुक केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे़ याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यासह सायबरसेल विभागाकडे तक्रार दाखल केली आहे़गणेश हा वावडदा येथे वास्तव्यास आहे़ काही दिवसांपूर्वी त्याने एका मित्राला दहा हजार देणे असल्यामुळे त्यास एटीएम कार्ड देऊन त्यातून तुझे पैसे काढून घे असे सांगितले होते़ त्यानुसार मित्राने दहा हजार रूपये काढून घेत दोन दिवसांनी त्याचे एटीएम कार्ड परत केले़ त्यानंतर पुन्हा एका मित्राला तीन हजार रूपयांची मदत हवी असल्यामुळे गणेशने त्याला सुध्दा एटीएम कार्ड वापरण्यासाठी दिले होते़ पैसे काढल्यानंतर दुसऱ्या मित्राने सुध्दा लागलीच गणेश याला एटीएम परत केले होते़ एटीएमकार्ड हे गणेश याच्याकडे असताना २९ मे रोजी तब्बल प्रत्येक दोन हजार रूपयांप्रमाणे आॅनलाईन २६ वेळा ट्रानझॅक्शन झाले़ यात पन्नास हजार रूपयांची आॅनलाईन शॉपिंग केली़ बुधवारी बँकेत गेल्यानंतर एटीएम पीन क्रमांकाचा वापर करून कुणीतरी आॅनलाईन शॉपिंग करत पन्नास हजार रूपयांची फसवणुक झाल्याचे लक्षात आले़ त्याने त्वरीत एमआयडीसी पोलीस ठाणे गाठत पोलिसांना संपूर्ण घडलेला प्रकार सांगितला़ पोलिसांनी लागलीच तक्रार दाखल करून घेत ती तक्रार सायबरसेल विभागाकडे पाठविण्यात आला़ दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपासून मोबाईल बंद असल्यामुळे ओटीपी क्रमांक देखील आला नसल्याचे गणेश याने पोलिसांना सांगितले़
जळगावला आॅनलाईन शॉपिंग करीत तरूणाला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 1:37 PM
२६ वेळा व्यवहार
ठळक मुद्देसायबर सेलकडे तक्रार