ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 30 - आधुनिक विज्ञान आणि संशोधनाच्या चमत्कारातून अवयवदान संकल्पना जन्मास आली. अवयवदानाने मानवी जन्माला सार्थक बनवता येते. मरणोत्तर अवयवदान म्हणजे पुन्हा नव्याने जगणे होय. अवयवदान संकल्पनेविषयी समाजात अनेक समज-गैरसमज आहेत. त्यावर उपाय म्हणजे प्रबोधन करणे. अशा प्रबोधनाची चळवळ उभी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
त्याची रुजुवात महाविद्यालयांमध्ये व्हावी.कारण त्यात युवा पिढी चैतन्याने वावरत असते, शिक्षणासोबत सामाजिक जाणीवेचे संस्कार घेत असतात. अवयवदान ही फक्त वैद्यकीय क्षेत्राची गरज नसून माणसा-माणसाची गरज आहे. तरुण-तरुणींकडून अवयवदानाचा संदेश समाजात रुजवता येईल, असे प्रतिपादन स्नेहबंधन ट्रस्टच्या विश्वसत आणि जनसंपर्क मीरा सुरेश यांनी केले. मूळजी जेठा महाविद्यालयातील महात्मा गांधी अध्ययन केंद्र आणि एन.सी.सी.युनिटच्या वतीने ‘जागर अवयवदानाचा.... वेध माणुसकीचा...’या प्रबोधन व संकल्प शिबीरात केले.