जळगाव : दाट धुके आणि त्यातच नाईट लॅन्डींगची सोय नसल्यामुळे मुंबईहून आलेले विमान जळगावात न थांबता थेट अहमदाबादला न्यावे लागले़ त्यामुळे पुन्हा एकदा जळगावच्या प्रवाशांना विमानसेवेचा चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला़ ही घटना जळगावात गुरुवारी घडली. योग्य वातावरणाच्या प्रतीक्षेत विमान काही वेळ आकाशातचं घिरट्या मारत होते, अशीही माहिती मिळाली आहे़जळगावातील ३९ प्रवाशांनी मुंबई ते जळगाव असे ट्रू-जेटचे तिकिट काढले होते. गुरूवारी ४़३० वाजेच्या सुमारास विमानाने जळगावसाठी प्रस्थान केले. साडेपाच ते पाऊणेसहा वाजेच्या सुमारास जळगाव विमानतळाजवळ पोहोचले़परंतु दाट धुके असल्यामुळे विमान काही वेळ आकाशातचं घिरट्या मारत होते़ तर दुसरीकडे नाईट लॅन्डींगची सुविधा नसल्यामुळे शेवटी विमान अहमदाबादला नेण्याचा निर्णय घेण्यात आला. विमान रात्री अहमदाबाद येथे पोहोचले़यापूर्वीही अर्धातास घातल्या होत्या घिरट्यासप्टेंबर महिन्यात देखील लॅन्डींगसाठी योग्य वातावरण नसल्यामुळे ट्रू- जेट कंपनीचे विमानाने तब्बल अर्धातास आकाशात घिरट्या घातल्यानंतर जळगावच्या प्रवाशांना थेट अहमदाबाद येथे नेले होते़ त्यावेळी देखील प्रवाश्यांची प्रचंड गैरसोय झाली होती़ आता परत तीच वेळ आली.प्रवाश्यांची नाराजीजळगावात विमान न उतरता थेट अहमदाबादला नेल्यामुळे प्रवाश्यांनी ट्रू-जेट कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली़ रात्री अहमदाबाद येथे विमान पोहोचल्यानंतर ट्रू-जेट कंपनीकडून जळगावच्या काही प्रवाश्यांना रात्रीच औरंगाबाद येथे विमानाने पाठविण्यात आले़ तर काही प्रवाशांना अहमदाबाद येथे राहण्याची सुविधा करून देण्यात आली असून त्या प्रवाशांना अहमदाबाद-जळगाव विमानाने परत जळगाव येथे पाठविण्यात येणार आहे.
जळगावचे प्रवासी अहमदाबाद नेऊन सोडले औरंगाबदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 10:46 PM