जळगाव : चोपडा शहर व तालुक्यातील धानोरा येथे पाचव्या दिवशी बाप्पाच्या विसर्जनात किरकोळ वादाच्या घटना घडल्या असल्या तरी तेथील विसर्जन शांततेत पार पडले आहे. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी चोपड्यात अजूनही ठाण मांडून आहेत. जिल्ह्यात सातव्या दिवशी २३३ मंडळांकडून विसर्जन मिरवणुका काढण्यात येणार आहे. मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी केले आहे.
चोपडा व धानोरा येथे वाद झालेले असले तरी त्यात बैठका घेऊन तोडगा काढण्यात आलेला आहे. जळगाव शहरात वाद्याच्या काही वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. रात्री दहा वाजेनंतर कोणीही वाद्य वाजवू नये. मिरवणुकांना कितीही वेळ लागला तरी पूर्ण वेळ पोलीस बंदोबस्त राहणार आहे. जिल्ह्यात ९ व्या दिवशी ८९ तर दहाव्या दिवशी एक हजार २४४ मंडळांकडून विसर्जन मिरवणुका काढल्या जाणार आहेत. विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पडाव्या यासाठी अजूनही शांतता समितीच्या बैठका घेतल्या जात आहेत.
संवेदनशील भागात अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले असून त्या ठिकाणी शीघ्र कृती दल, पोलीस, द्रुत कार्य दल अर्थात आरएएफ, आरसीपी आदींचा ताफा तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक शहरात संवदेनशील भागातून पथसंचलन केले जात असल्याचे पोलीस अधीक्षक मुंढे यांनी सांगितले.