सुनील पाटील
जळगाव : समता नगरातील आठ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करुन तिच्या हत्येच्या जखमा ताज्या असतानाच पुन्हा वाघ नगर परिसरात पाच वर्षीय मुलीला घरातून उचलून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना दस-याच्या दिवशी उघडकीस आली. चार महिन्यात घडलेल्या या दोन्ही घटना मानवतेला काळीमा फासणा-या आहेत. दोन्ही घटनांमध्ये नराधमांना अटक करण्यात आली असली तरी समाजमनावर त्याचा खूप मोठा परिणाम झालेला आहे.दोन्ही घटनांमधून तमाम पालकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. शाळा, महाविद्यालयात गेलेली मुलगी असो की अंगणात खेळणारी बालिका ही सुरक्षित आहे? यावर पालकांचा विश्वासच बसत नाही. दोन वर्षापूर्वीही रामेश्वर कॉलनीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडली होती. २०१४ मध्ये घडलेल्या एका घटनेत तर नात्यातील नराधमाने बालिकेला वासनेची शिकार केली होती. त्याला गेल्या आठवड्यातच मुंबईतून अटक केली. या घटनांवर प्रकाशझोत टाकला तर प्रत्येक मुलीच्या पालकांमध्ये आज भीती निर्माण झाली आहे. पोट भरण्यासाठी मिळेल तेथे आश्रय घेऊन जीवन जगणा-या वाघ नगरातील या कुटुंबातील हा पाच वर्षीची बालिका आजीजवळ झोपलेली असताना वासनांध झालेल्या नराधमाने तिला उचलून नेत अत्याचार केला. रक्तबंबाळ अवस्थेत रडत असताना जागे झालेल्या कुटुंबातील सदस्यांनी धाव घेत मुलीला जवळ घेतले. तिची अवस्था पाहता कुटुंबाची स्थिती तर जीवंतपणीच मेल्यासारखी झाली. समाज मनाचा दबाव व घटनेचे गांभीर्य पाहता थेट पोलीस अधीक्षकापासून यंत्रणा रस्त्यावर उतरली. चार तासाताच अत्याचार करणा-या नराधमाला शोधून काढले. हा नराधम पोलिसांच्या रेकॉर्डवरचा सराईत गुन्हेगार निघाला. आधी चोरी करुन त्याने हे घाणेरडे कृत्य केले.समता नगरातील घटनेतील नराधम आदेशाबाबाचा खटला पुढील महिन्यात न्यायालयात सुरु होत आहे. असे प्रकरण जलदगतीने चालवून दोषींना कठोरातील कठोर शिक्षा करावी, तेव्हाच या घटनांना पायबंद बसेल.