- विजयकुमार सैतवालजळगाव - अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून ते पोलिस ठाण्यात नेत असताना पोलिस नाईक प्रशांत शांताराम पाटील यांना ट्रॅक्टरच्या खाली ढकलून देत व शिवीगाळ करीत हे ट्रॅक्टर पळनून नेले. ही घटना २० जुलै रोजी घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात २० जुलै रोजी रात्री सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
खोटे नगर परिसरातील समर्थ कॉलनी ते खोटेनगर थांब्यादरम्यान वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिस नाईक प्रशांत पाटील यांनी पकडले. त्यात एक ब्रास वाळू होती. हे ट्रॅक्टर पोलिस ठाण्यात आणत असताना ट्रॅक्टर चालक देवानंद (पूर्ण नाव समजू शकले नाही), मालक अर्जुन पाटील, मोहसीन खान व इतर तीन ते चार जणांनी पोलिस नाईक पाटील यांना अरेरावी करीत त्यांना ट्रॅक्टरच्या खाली रस्त्यावर ढकलून दिले. तसेच त्यांना शिवीगाळ करीत एक ब्रास वाळू असलेले विना क्रमांकाचे ट्रॅक्टर व ट्रॉली पळवून घेऊन गेले.
या प्रकरणी पोलिस नाईक पाटील यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वरील सहा ते सात जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील हे करीत आहेत.परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक आप्पासाहेब पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, अवैध वाळू वाहतूक सुरूच असून आता तर पोलिसाला ढकलून देण्यापर्यंत वाळू वाहतूकदारांची हिम्मत वाढली आहे.