जळगाव : जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र भास्करराव पाटील (वय ५८) यांचे रविवार, २९ रोजी सकाळी पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले. २ जुलै रोजी ते आपल्या घरातील जिन्यावरुन पडल्याने त्यांच्या मानेच्या मणक्याला दुखापत झाली होती. काही दिवस जळगावला उपचार घेतल्यानंतर त्यांना पुणे येथे हलविण्यात आले होते. त्यांच्या२ निधनाचे वृत्त कळताच जळगावकर हळहळले.दरम्यान, रविवारी रात्री त्यांचे पार्थिव पुण्याहून जळगावला आणण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी १० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. १९८५ पासून नरेंद्र पाटील हे तत्कालीन नगरपालिका व आताच्या महानगरपालिकेत नगरसेवक होते. १९९१ मध्ये कॉंग्रेसतर्फे तर त्यानंतर त्यांनी भाजपातर्फेदेखील निवडणूक लढविली. सध्याचा महानगरपालिकेत महानगर विकास आघाडीचे ते नगरसेवक आहेत. २ जुलैपासून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याने त्यांनी यावेळी महानगरपालिका निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या ३० वर्षांपासून गैरव्यवहाराविरोधात लढताना नरेंद्र पाटील यांनी आपल्या तत्वांशी प्रामाणिक राहून शहराच्या विकासाच्या दृष्टीने अनेक विषय लावून धरले.
जळगावातील ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र भास्करराव पाटील यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 1:15 PM