- सुनील पाटील
जळगाव - महापालिकेची निवडणूक अवघ्या तीन महिन्यावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची या दृष्टीने शिवसेना शिंदे गटाने व्यूहरचना आखायला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून शनिवारी शिंदे गटाच्या सर्व नगरसवेकांची अजिंठा विश्रामगृहावर बैठक घेण्यात आली. त्यात पक्ष संघटन वाढविण्यासाठी नियोजन करण्यात आले.
नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटाची प्रचंड पिछेहाट झाली. जळगाव बाजार समितीत हातची सत्ता गेली. खास करुन शिंदे गटाच्या सर्व आमदारांच्या मतदार संघात त्यांना फटका बसला. आता सर्वोच्च न्यायालयात सरकारला दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पक्षात चैतन्याचे वातावरण आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व त्यानंतर होणाऱ्या लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका पाहता आतपासूनच लोकांमध्ये जाऊन त्यांच्यापर्यंत सरकारच्या योजना पोहचविण्यासह संघटन वाढविण्यावर भर दिला जात आहे. पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी व नगरसेवकाने वॉर्डात जाऊन बैठका घेण्यासह सभासद वाढवावेत. नगरसेवकाने आपण केलेल्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहचवावी, असे या बैठकीत ठरले.
श्याम कोगटा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला मनपातील शिंदे गटाचे गटनेते ॲड.दिलीप पोकळे, नगरसेवक गणेश सोनवणे, चेतन सनकत, नवनाथ दारकुंडे, मनोज चौधरी, कुंदन काळे, हर्षल मावळे, नगरसेविका ज्योती चव्हाण, प्रतिभा देशमुख यांच्यासह पक्षाच्या पदाधिकारी रेखा पाटील, शोभा चौधरी आशुतोष पाटील, सोहम विसपुते, भारती रंधे, निशा पवार, अजय देशमुख, ज्योती शिवदे व शेख इकबाल आदी उपस्थित होते.