कामगार संघटनांच्या पाठपुराव्याला यश : मुंबईला जात असल्याने अनेकांना झाली होती कोरोनाची बाधा
कर्मचाऱ्यांना दिलासा : कामगार संघटनांच्या पाठपुराव्याला आले यश
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मुंबई येथे बेस्टच्या सेवेसाठी जाणाऱ्या चालक-वाहकांना यापुढे मुंबईला न पाठविण्याबाबत महामंडळाने जळगाव विभागाला पत्र पाठविले आहे. मुंबईला बेस्टच्या सेवेसाठी जात असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. अखेर महामंडळ प्रशासनाने यापुढे जळगावच्या कर्मचाऱ्यांना न बोलाविण्याचा निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे, तर कामगार संघटनांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
कोरोनामुळे मुंबईत सर्वसामान्य नागरिकांना लोकल सेवा बंद असल्यामुळे मुंबईकरांसाठी बेस्टतर्फे जादा बस सोडण्यात आल्या होत्या. या जादा बससाठी एस.टी. महामंडळाच्या चालक व वाहकांची मदत घेण्यात आली होती. त्याकरिता महामंडळाच्या राज्यातील काही विभागांमधून दर आठवड्याला चालक व वाहकांना बोलाविण्यात येत होते. त्यानुसार जळगाव विभागातून दर आठवड्याला ५० चालक व ५० वाहक मुंबईला जात होते. गेल्या वर्षी सप्टेंबरपासून जळगाव विभागातील कर्मचाऱ्यांना या सेवेसाठी पाठविण्यात येत होते.
इन्फो :
अनेक कर्मचाऱ्यांचा सुरुवातीपासून होता विरोध
मुंबई येथे कोरोना संसर्गाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्याने जळगाव विभागातील अनेक कर्मचाऱ्यांनी बेस्टच्या सेवेला जाण्याकरिता विरोध दर्शविला होता, तसेच या प्रकाराबाबत सुरुवातीपासूनच इंटक संघटना व सेना कामगार संघटना कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभ्या राहिल्या होत्या. हा निर्णय मागे घेण्याबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता.
इन्फो :
...अखेर जळगावच्या कर्मचाऱ्यांना दिलासा
जळगावहून मुंबईला इतक्या लांब अंतरावर बेस्टच्या सेवेसाठी जात असल्याने तेथून आल्यानंतर काही कर्मचाऱ्यांच्या परिवारालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे या प्रकाराला सर्व स्तरातून विरोध दर्शविला जात होता. महामंडळाने हा निर्णय मागे घेण्याबाबत विविध कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केल्यामुळे महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.
इन्फो :
बेस्टसाठी जळगाव विभागातून चालक-वाहकांना नियमित पाठविण्यात येत होते. मात्र, आता यापुढे त्यांना पुढील आदेश येईपर्यंत पाठविण्यात येऊ नये, असे लेखी आदेश जळगाव विभागाला देण्यात आले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना बेस्टच्या सेवेसाठी पाठविण्यात येणार नाही. या बाबतीत इंटक संघटनेच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
नरेंद्रसिंह राजपूत, विभागीय सचिव, इंटक संघटना.
जळगाव विभागातील कर्मचाऱ्यांना मुंबईला न पाठविण्याबाबत एस.टी. कामगार सेनेतर्फे परिवहनमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. अखेर महामंडळाने हा निर्णय मागे घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांचा मुंबईला जाण्याचा त्रास वाचला आहे.
गोपाळ पाटील, राज्य प्रसिद्धी प्रमुख, एस.टी. कामगार सेना.