- भूषण श्रीखंडेजळगाव - काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर अपघात घडल्यानंतर एक खासगी बसचा चालक वाहन चालविताना मोबाइलवर व्हिडीओ पाहत असल्याचे व्हिडीओ समोर आला होता. आरटीओ विभागाने तातडीने या खासगी बसवर कारवाई केली होती. एसटी महामंडळाने देखील याबाबत गांभीर्याने दखल घेतली असून, बस चालविताना जर चालक मोबाइलवर बोलत असल्याची तक्रार आल्यास त्याच्यावर तत्काळ कडक कारवाई करण्याचे पत्र एसटी महामंडळाचे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत.
एसटीचा प्रवास सुरक्षित व विश्वासार्ह असल्यामुळे प्रवासासाठी नागरिक एसटी बसला प्राधान्य देतात; परंतु बसवरील चालक बस चालविताना मोबाइलवर बोलताना आढळून येत असल्याच्या तक्रारी एसटी महामंडळाकडे येत आहे. याबाबत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. चालकांच्या या निष्काळजीपणामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे प्रवासी सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता झाली आहे. त्यामुळे सर्व विभागप्रमुखांना एसटीचे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी यांनी पत्र काढून बसचालकांना बस चालविताना मोबाइलवर न बोलण्याच्या सूचना, तसेच तक्रार आल्यास कडक कारवाई करण्याच्या सूचना या पत्राद्वारे दिल्या आहेत.
फोटो, व्हिडीओ समोर आल्यास होणार कारवाईएसटी बस चालविताना जर चालकाचा व्हिडीओ, फोटो तसेच तक्रार ही एसटी विभागाला मिळाली किंवा सोशल माध्यमातून समोर आल्यास संबंधित चालकावर विभागीय अथवा आगारस्तरावर कडक कारवाई होणार आहे.
सर्व चालकांचे प्रबोधन करा...एसटी विभागप्रमुखांनी याबाबत प्रबोधन करून सूचनांची माहिती सर्व चालकांना द्यावी; तसेच मार्ग तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी तपासणी करणे; तसेच चालकांनी वाहन चालविताना प्रबोधन करून प्रवाशांना चांगला व सुरक्षित प्रवासाची सेवा द्यावी, अशा सूचना दिल्या आहेत.