ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 17 - शहरातील सर्व खासगी व शासकीय शाळांना गुरुवारी पतेती निमित्त शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र आपल्या शासकीय कामांमुळे शिक्षकांना शाळेत यावे लागणार असल्याने पतेतीची सुट्टी वाया जावू नये म्हणून विद्याथ्र्याचीही सुट्टी रद्द करून गुरुवारी शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय शहरातील रोझलॅण्ड इंग्लिश स्कूलने घेतला आहे. शाळेच्या या निर्णयाविरोधात पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गुरुवारी सर्व शाळांना ‘पतेती’ची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र शहरातील रोझलॅण्ड शाळा प्रशासनाने शासकीय निर्णय डावलून सुट्टीच्या दिवशी शाळा घेण्याचा फतवा काढला आहे. शिक्षकांच्या कामामुळे विद्याथ्र्याची सुट्टी रद्द करण्याचा संबध काय? असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे. शाळेतील मराठी व इंग्लिश मिडियमच्या शिक्षकांचे गुरुवारी शालेय काम आहे. त्यामुळे गुरुवारी सुट्टी असतानाही शिक्षकांना शाळेत यावे लागत असल्याने शिक्षकांची सुट्टी वाया जाणार होती. त्यामुळे पतेतीची सुट्टी रद्द करून ही सुट्टी पुढील इतर दिवशी घेण्याची मागणी शिक्षकांनी केली होती. त्यानुसार संस्थाध्यक्ष व मुख्याध्यापकांनी ही सुट्टी रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.शासनाकडून दरवर्षी सुट्टय़ांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत असते. त्या सुट्टय़ांसह शिक्षण विभागाकडून देखील 14 सुट्टय़ा जाहीर केल्या जात असतात. तसेच या सुट्टय़ा घेणे हे प्रत्येक शाळेला बंधनकारक आहे.मात्र रोझलॅण्ड शाळा प्रशासनाकडून या निर्णयाला हरताळ फासण्यात आला आहे. अनेक पालकांना देखील शासकीय सुट्टी असल्याने बेत आखण्यात आले होते. मात्र शाळा प्रशासनाने सुट्टीच रद्द केल्याने पालकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच रिक्षाचालकांनी देखील शाळा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सुट्टय़ा या शाळा प्रशासनाने घेतल्याच पाहिजे. शाळा प्रशासनाकडून सुट्टी रद्द केल्यास संबधित शाळांवर कारवाई करण्यात येईल.-देवीदास महाजन, शिक्षणाधिकारी,
शाळेने पतेतीची सुट्टी रद्द केलेली नाही. फक्त ती सुट्टी गुरुवारी न घेता इतर दिवशी घेतली जाणार आहे. गेल्या वर्षी देखील अशा प्रकारे निर्णय घेण्यात आला होता. याबाबत तुम्हीच संस्थाध्यक्षांशी चर्चा करा. -मिनाक्षी पाटील, मुख्याध्यापिका,रोझलॅण्ड स्कूल