जळगाव : जळगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील नेक्सा शोरूमसमोर रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या राजकुमार सोमोमल धामेचा (६५, रा.रा. सम्राट कॉलनी) या वृद्धाला भरधाव कारने जोरदार धडक दिली. मात्र, गंभीर दुखापतीमुळे वृध्दाला आपला जीव गमवावा लागला. ही घटना मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, जखमी वृध्द व्यक्ती ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असता, त्यांना वाचविण्यासाठी काही तरूणांनी रूग्णवाहिकांना व पोलिसांना संपर्क साधला. पण, मदत उशिराने मिळाल्यामुळे वृद्धाचा रूग्णालयात मृत्यू झाला.
राजकुमार धामेचा हे परिवारासह सम्राट कॉलनी येथे वास्तव्याला होते. गेल्या १० वर्षांपासून ते एमआयडीसीतील बाबा नमकीन येथे नोकरीला होते. मंगळवारी नेहमीप्रमाणे ते कामावर गेले होते. पण, प्रकृती बरी नसल्यामुळे रात्री ते घरी येण्यासाठी निघाले. जळगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील नेक्सा शोरूमजवळ ते रिक्षाची वाट पाहत होते. त्यावेळी मागून अज्ञात कारने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.कामगार तरूणांची मदतीसाठी धाव...आर.एल.चौफुलीजवळील सुप्रिम कंपनीमधील कामगार नीलेश नारखेडे, वैभव पाटील, उमेश चौधरी, संदीप सोनार हे रात्री ११ वाजेच्या सुमारास ड्युटी संपवून कंपनीतून बाहेर निघाले. त्यावेळी त्यांना नेक्सा शोरूमजवळ रक्ताच्या थारोळ्यात वृद्ध व्यक्ती दिसून आली. वृद्धाला वाचविण्यासाठी त्यांनी तत्काळ रूग्णवाहिकेला आणि पोलिसांना संपर्क केला. मात्र, अर्धा पाऊण तास उलटूनही कुठली मदत मिळत नसल्यामुळे अखेर तरूणांनी रस्त्यावरील वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला. नंतर एक वाहन थांबवून वृद्धाला जिल्हा रूग्णालयात नेले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा तत्काळ उपचाराला सुरूवात केली. मात्र, त्याचवेळी वृद्धाची प्राणज्योत मालवली. जर लवकर मदत मिळाली असती, वृद्धाचे प्राण वाचले असते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, ५ विवाहित मुली, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ. अल्ताफ पठाण आणि सिध्देश्वर डापकर करीत आहे