जळगाव : अॅट्रॉसिटी अॅक्ट शिथिल करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाविरोधात विविध संघटनांनी एकत्र येत आज भारत बंदची हाक दिली आहे. पुकारण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान अंतुर्ली (मुक्ताईनगर) येथे सोमवारी (2 एप्रिल) सकाळी गालबोट लागले. बाजार पेठेत अज्ञातांनी दगडफेक केल्याने तीन जण जखमी झाले तर एका चारचाकीच्या काचा फुटल्या. आंदोलनकर्त्यांनी एस.टी. बस रोखून धरली. यामुळे गावात तणावाची परिस्थिती आहे. सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
दगडफेकीत गोपाळ श्रावण पाटील, संदीप भागवत महाजन व प्रदीप वंजारी हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. दरम्यान, बाजारपेठेत लावण्यात आलेले शुभेच्छा फलकदेखील फाडण्यात आले. मध्य प्रदेश येथून आलेल्या पाहुण्यांच्या वाहनावर (क्र. एमपी ०९ सी.क्यू.५२८४ ) वर दगडफेक झाल्याने तिच्या फुटल्या. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले आहे. दंगा नियंत्रण पथकासह बोदवड, वरणगाव येथून अतिरिक्त पोलीस कुमक मागवण्यात आली आहे.