लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : मित्र अथवा अन्य कोणाला सोबत घेत थेट ट्रीपल सीट जाणाऱ्या दुचाकीस्वारांवर वाहतूक शाखेच्यावतीने कारवाई करण्यात येत असून तीन दिवसात ४६ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. त्यांना ४५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला.
शहर व परिसरात अल्पवयीन मुलेदेखील दुचाकी चालवत असल्याचे नेहमी आढळून येते. या मुलांच्या हाती वाहन देऊ नये, असे वारंवार आवाहन करण्यात येते. मात्र हा प्रकार सुरूच असतो. क्लास, महाविद्यालयात जाताना अनेक तरुण, तरुणी ट्रीपल सीट जातात. यासोबतच इतरही दुचाकीस्वार ट्रीपल सीट जात असतात. या संदर्भात ‘लोकमत’ने छायाचित्र प्रकाशित केले होते.
ट्रीपल सीट जाणाऱ्या दुचाकींस्वारांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक एम. राजरकुमार यांनी दिल्या. त्यानुसार वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी शहरात वेगवेगळ्या भागात कारवाई केली.
तीन दिवसात ४६ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात येऊन त्यांना ४५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. या कारवाई दरम्यान गिरणा टाकी परिसरात तर एका दुचाकीवर चार जण जाताना आढळून आले. त्यांना थांबवून दंड करण्यात आला.