- विजयकुमार सैतवाल जळगाव - कुटुंबातील सर्व सदस्य कामावर गेलेले असताना घरात अचानक आग लागून पत्र्याचे तीन घरे जळून खाक झाले. या आगीमुळे दोन गॅस सिलिंडर फुटण्यासह घरातील फ्रिज, कपाट, कपडे, धान्य, भांडे, महत्त्वाची कागदपत्रे, रोख रक्कमसह सर्व काही आगीच्या भक्षस्थानी सापडले. त्यामुळे चार कुटुंबे उघड्यावर आली आहे. ही घटना सोमवार, १८ मार्च रोजी मन्यारखेडा परिसरात घडली.
मन्यारखेडा परिसरातील साईनगर भागात मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांची घरे आहेत. यापैकी एका शेजारी एक असलेल्या पत्र्यांच्या तीन घरात नितीन भटकर, अशोक भटकर, रोहित सुनील भारुळे, रमेश यशवंत शिंदे यांचे कुटुंब राहते. सोमवारी, १८ फेब्रुवारी रोजी सकाळी या चारही कुटुंबातील सर्व सदस्य कामावर गेले होते. त्यानंतर अचानक घरामध्ये आग लागली व ती पसरत गेल्याने तीन घरे त्यात जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबातील सदस्य घराकडे पोहचले. तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी सिलिंडर फुटल्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
दोन बंबांद्वारे आग नियंत्रणातआगीची माहिती महापालिकेच्या अग्नीशमन विभागाला देण्यात आली. त्या वेळी निवांत इंगळे, प्रदीप धनगर, संजय तायडे, भूषण पाटील, नितीन ससाने, चेतन सपकाळे हे तेथे पोहचले व त्यांनी दोन बंबाद्वारे आग नियंत्रणात आणली. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण करून सर्व काही नष्ट झाले होते.
सिलिंडर, फ्रिज फुटलेआग लागल्यानंतर घरातील एका पाठोपाठ दोन सिलिंडर फुटले. त्यामुळे आग अधिकच वाढली. त्यामुळे घरातील कपडे, लोखंडी कपाट, भांडे, धान्यही जळाले. या शिवाय धान्याच्या कोठ्या, भांड्याचे रॅक जळून वाकले. या आगीमध्ये फ्रिजही फुटले व त्याचे वेगवेगळे तुकडे झाले.
रोख रक्कम, कागदपत्रेही जळालीघरात आवश्यक व महत्त्वाची कागदपत्रेही कपाटात ठेवलेले होते. तेदेखील जळून खाक झाले. इतकेच नव्हे घरात ठेवलेली रोख रक्कमही जळून नष्ट झाली.
सर्व काही संपले, आता काय करावे?आगीमुळे चार कुटुंबांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घरातील सर्व सदस्य बाहेर गेलेले असल्याने सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. मात्र घरात काहीच शिल्लक राहिले नसून केवळ अंगावरचे कपडे शिल्लक राहिले आहे. आगीमुळे सर्वकाही संपले असून आता काय करावे, असा प्रश्न या कुटुंबांनी उपस्थित केला.