- सुनील पाटीलजळगाव - समाजात दोन प्रकारचे पुढारी असतात, एक खरे बोलणारे आणि दुसरे खोटे बोलणारे. लेखकदेखील पुढारीच असून, तो खरे बोलणारा आहे. लेखकांनी आपण जसे आहोत तसेच वागलं पाहिजे, व्यक्त झाले पाहिजे. तुमच्यासारखं दुसरं कोणीच नसतो. लपवले तर पुढारी किंवा समूहाचा नायक होऊ शकत नाही, असे स्पष्ट मत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले.
भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन व बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट यांच्यावतीने मंगळवारी जैन हिल्स येथे साहित्य-कला पुरस्कार २०२३ चे वितरण करण्यात आले. कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार पद्मश्री सतीश आळेकर (पुणे), सर्वोत्कृष्ट लेखिका कवयित्री बहिणाबाई पुरस्कार सुमती लांडे (श्रीरामपूर), सर्वोत्कृष्ट कवी बालकवी ठोमरे पुरस्कार अशोक कोतवाल (जळगाव) व सर्वोत्कृष्ट गद्य लेखन ना.धों.महानोर पुरस्कार सीताराम सावंत (इटकी, ता.सांगोला, जि.सातारा) यांना प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व एक लाखाचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होते. आळेकर यांना दोन लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला. डॉ.भालचंद्र नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याच्या व्यासपीठावर जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, दलिचंद जैन, ज्योती जैन, नीशा जैन व पुरस्कारार्थी होते.
एकांतात सार्वजनिक शोधले तर विरोध करण्याचे सामर्थ्यप्रत्येक लेखकाजवळ नवीन साहित्य असले पाहिजे. काहींना कथा काय अन् कादंबरी काय, सुरुवात कशी करावी अन् शेवट कसा करावा हेदेखील कळत नाही. आपल्याजवळ असं असावे की त्यातून तुमचं व्यक्तिमत्त्व घडवू शकले तरच तुम्ही पुढे जाल. सार्वजनिक एकांत महत्त्वाचे मूल्य आहे. एकांतात सार्वजनिक शोधले पाहिजे. त्यात नक्कीच मार्ग सापडतो. विरोध करण्याचे सामर्थ्य येते. साहित्यिकांनी न दिसणारे सत्य शोधले पाहिजे. त्यासाठी प्रत्यक्ष भेटी आवश्यक असतात. रामायणही वेगवेगळे असल्याचे डॉ.नेमाडे म्हणाले.
लिखाणात लोकशाही टिकावीपुरस्कारार्थींनी मनोगत व्यक्त केले. आजचा पुरस्कार बळ देणारा आहे. लोकशाही कशी टिकेल यासाठी दबाव निर्माण करणारे लिखाण असावे, असे मत सीताराम सावंत यांनी व्यक्त केले तर पद्मश्री सतीश आळेकर यांनी आज समाजातील परिस्थिती पाहिली तर जग वांझोटे असल्याचा भास होतो. १९९७ पासून ना.धों.महानोर यांच्याशी परिचय आहे. ज्या चित्रपटासाठी त्यांनी गाणी लिहिली त्याच चित्रपटाचे आपण कथा लिहिल्याचे त्यांनी सांगितले. ज्ञानेश्वर शेंडे यांनी सूत्रसंचालन केले.