जळगाव : उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या शिक्षक भवनात २०१४मध्ये एका विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात अला अब्दुल रहिम मोहम्मद (२७, रा. गाझाभट्टी, पॅलेस्टाईन, ह. मु. औरंगाबाद) व परवीन (पारसी) वेसी बिरगोनी शहा हुसेन (४६, रा. इराण, ह. मु. पुणे) यांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंगळवारी दीड वर्षाची शिक्षा सुनावली.जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडले होते; मात्र या निकालाच्या विरोधात तत्कालीन सरकारी अभियोक्ता गोपाळ जळमकर यांचा अपिलाचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाच्या सहसचिवांनी मंजूर करून खंडपीठात अपील दाखल केले होते. खंडपीठाचे न्या. ए. के. सोनवणे यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. त्यांनी दोघांना या गुन्ह्यात अटकेपासून कारागृहात असेपर्यंतची शिक्षा सुनावली. ९ आॅक्टोबर २०१४ ते १६ मे २०१६ पर्यंत अला अब्दुल आणि परवीन कारागृहात होते. त्यामुळे दीड वर्षाची त्यांची ही शिक्षा भोगून झालेली आहे. सरकारतर्फे अॅड. एस. पी. सोनपावले यांनी तर अला याच्यातर्फे अॅड. मोहम्मद इम्रान अहमद व पारवीनतर्फे विनोद पाटील यांनी काम पाहिले. विद्यापीठात एम. एससी.च्या पहिल्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर ३ आॅगस्ट २०१४ रोजी शिक्षक भवनात अला अब्दुल याने जेवणातून गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केला होता.
जळगाव विद्यापीठ अत्याचार; दोघांना दीड वर्षाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 3:25 AM