- अमित महाबळ जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षांचे निकाल ३० ते ४५ दिवसाच्या आत जाहीर करून राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये अग्रस्थान प्राप्त केले आहे. तसेच परीक्षा निकालातील त्रुटी देखील कमी केल्या आहेत, अशी माहिती प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांनी परीक्षा विभागाची कार्यपद्धती आणि तणावमुक्त व कॉपीमुक्त परीक्षा या विषयांवरील बैठकीत दिली. मंगळवारी विद्यापीठात ही बैठक घेण्यात आली.
अधिसभा सदस्य, महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, शिक्षक प्रतिनिधी व विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रा.योगेश पाटील, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, माजी संचालक प्रा.दीपक दलाल यांनी मार्गदर्शन केले. प्रा. योगेश पाटील यांनी परीक्षेशी निगडीत अध्यादेशाची सविस्तर माहिती बैठकीत दिली. कॉपी केल्यास कोणत्या शिक्षा होऊ शकतात याची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी, असे आवाहन केले. प्रास्ताविक कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.मुनाफ शेख यांनी केले. व्यवस्थापन परिषद सदस्य ॲड. अमोल पाटील व प्रा. सुरेखा पालवे यांनी मनोगत व्यक्त केले.
तक्रारी महाविद्यालय स्तरावर सोडवाप्रा. एस. टी. इंगळे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या परीक्षा निकालासंदर्भातील तक्रारी विद्यापीठात प्राप्त होण्यापूर्वी त्या महाविद्यालय स्तरावर सोडविल्या जाव्यात. विद्यार्थ्यांना विद्यापीठात येण्याची गरज पडू नये. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात तासिकांना नियमित उपस्थिती द्यावी. जेणेकरून त्यांना कॉपी करण्याची गरज भासणार नाही. यासाठी विद्यापीठाच्या अभियानाला संघटनांनी व सर्व घटकांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
विधी शाखेचा पॅटर्न सुधारित कराविद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींनी विधी शाखेचा पॅटर्न सुधारित करावा, प्राध्यापकांनी आदर्श उत्तर पत्रिका कशी लिहावी याचे मार्गदर्शन करावे, विद्यार्थ्यांचा तक्रारींचा निपटारा त्वरीत व्हावा, महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवाव्यात यासारख्या विविध मागण्या केल्या.