- चुडामण बोरसे जळगाव - जिल्ह्याच्या काही भागात शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. वादळामुळे रावेर तालुक्यात १५ ते १६ गावांमध्ये केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. घरांवरील पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
अचानक आलेल्या वादळी पावसामुळे वातावरणात काही वेळ गारवा निर्माण झाला होता. यामुळे कडक उन्हामुळे बेजार झालेल्या नागरिकांना काही वेळ दिलासा मिळाला. भुसावळ येथे वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाड उन्मळून पडली. काही ठिकाणी फलकही खाली पडले. रावेर तालुक्यात आधीच उष्णतेत होरपळलेल्या केळीबागांना शनिवारी सायंकाळी वादळी पावसाने तडाखा दिला. यात केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास वादळाने हिरावला. यामुळे शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे.
यावल व मुक्ताईनगर येथे २० मिनिटे पाऊस झाला. जामनेर येथे वादळामुळे बहुतेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता. तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी पाऊस झाला.