लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार जळगाव शहरात शनिवारी लॉकडाऊनला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. फळे आणि भाजी विक्रीची दुकानेदेखील शनिवारी बंद होती. शहरातील बाजारपेठेत सकाळी काही भाजी विक्रेते आले होते. मात्र त्यांना पोलिसांनी घरी पाठवले. तर महाबळ परिसरात दुपारी साडेचार पर्यंत फक्त एकच भाजीविक्रेता बसून होता. तेथे भाजी आणि फळे विक्रीला परवानगी आहे की नाही, यावरून विक्रेत्यांमध्ये संभ्रम होता. प्रशासन आणि विक्रेत्यांमध्ये संभ्रम असल्याने बाजारात भाजी विक्रेते फारसे दिसून आले नाही.
जिल्हा प्रशासनाने शनिवारी आणि रविवारी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यात नागरिकांना अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर फिरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच फक्त हॉस्पिटल, मेडिकल दुकाने आवश्यक वैद्यकीय सुविधा, किराणा दुकाने भाजी आणि फळ विक्री, दूध विक्री केंद्रे सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. त्याची माहितीदेखील प्रशासनाने एक दिवस आधी जाहीर केली होती. तरीदेखील सुभाष चौक व मुख्य बाजारपेठेत सकाळी जे भाजी विक्रेते आले होते, त्यांना पोलिसांनी व्यवसाय करू दिला नाही आणि परत पाठवले. मात्र हे विक्रेते सकाळची भाजी खराब होईल, म्हणून पुन्हा सायंकाळी येथे व्यवसाय करण्यासाठी आले होते.
महाबळ परिसरात छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहाच्या रस्त्यावर सकाळी १० वाजेपासूनच एकही भाजी विक्रेता नव्हता. शुक्रवारपासून तेथील काही भाजी आणि फळ विक्री करायची की नाही, याबाबत संभ्रम होता. त्यामुळे शनिवारी सकाळपासून एकही भाजी आणि फळ विक्रेता तेथे आला नव्हता. असे असले तरी महाबळ चौक आणि त्यापुढील भागात काही भाजी आणि फळ विक्रेते हात गाड्या लावून व्यवसाय करत होते.
गणेश कॉलनी चौक ते ख्वाजामिया दर्गा आणि रिंग रोड या परिसरात सकाळपासूनच भाजी विक्रेते बसलेले नव्हते. मात्र मोकळ्या जागेत काही भाजी विक्रेते बसलेले दिसून आले. तेथे पोलिसांनी त्यांना हटकले नाही.
ठिकठिकाणी बॅरिकेट्स
विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेट्स लावले होते. काव्य रत्नावली चौक, आदर्श नगर, महाबळ चौक, गणेश कॉलनी, पिंप्राळा, कोर्ट चौक, चित्रा चौक, टॉवर परिसर या परिसरात पोलिसांनी बॅरिकेट्स लावले होते. तर सकाळी पोलीस मुख्य बाजारपेठेसह इतर परिसरातदेखील घराबाहेर निघालेल्या नागरिकांची चौकशी करत होते.