- अमित महाबळजळगाव - राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून प्रचंड त्रास सहन केला. त्या परिस्थितीत काय होईल हे माहीत नव्हते. चुकीचा निकाल लागला असता तर आमचे काय झाले असते? याचा विचार भाजपा कार्यकर्त्यांनी करावा, अशी भावना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केली.
जळगाव जिल्हा शिवसेना व भाजपाचा बालेकिल्ला आहे. आमची युती बळजबरीने झालेली नाही, तर हिंदुत्वाच्या विचारांवर आधारित आहे. महायुतीचे सरकार येण्यासाठी आम्हाला सर्वांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्या दिवसांत मुले, आई, बायकोला गद्दार म्हणून हिणवले गेले. आमचे घरातले फोन बंद असायचे. त्या परिस्थितीत काय होईल हे आम्हाला माहीत नव्हते. भाजपा कार्यकर्त्यांनी आमचा विचार करून पाहावा. चुकीचा निकाल लागला असता तर आमचे काय झाले असते ? असेही पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
आम्हीही झेंडे वाटले...प्रभू श्रीराम सगळ्यांचे आहेत. आम्हीही गावात झेंडे वाटले. आंदोलनादरम्यान कारागृहात गेलो होतो. जिल्हा परिषद, पंचायत समिती या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीतही १०० टक्के युती झाली पाहिजे. ६०-६५ दिवसांवर लोकसभा निवडणुका आलेल्या आहेत. त्या आजपासूनच लागल्या आहेत, असे समजावे. महायुतीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता गडबड करत असेल तर त्याला समज देण्याची जबाबदारी समन्वयकांची आहे, असेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.