- विजयकुमार सैतवालजळगाव - हातभट्टीची दारु निर्मिती, विक्री यासह रामानंद नगर पोलिस ठाण्यात वेगवेगळे १६ गुन्हे दाखल असलेल्या जळगावातील धनुबाई उर्फ धन्नो यशवंत नेतलेकर (५०, रा. हरिविठ्ठल नगर) या महिलेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करीत तिला स्थानबद्ध करण्यात आले. महिलेला एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे.
हरिविठ्ठल नगर परिसरात धनुबाई उर्फ धन्नो नेतलेकर ही महिला बेकादेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करून परिसरात विक्री करते. या प्रकरणी तिच्यावर गुन्हेदेखील दाखल आहेत. हे प्रकार थांबावे म्हणून या महिलेवर प्रतिबंधात्मक कारवाईदेखील करण्यात आली. मात्र तरीदेखील दारुविक्री सुरूच होती. त्यामुळे परिसरातील तरुण पिढीत व्यसनाधीनता वाढत असल्याने पोलिसांनी कडक कारवाईचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी धन्नो नेतलेकर हिच्यावर एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव पाठविला. त्यानुसास पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी त्याचे अवलोकन केले. त्यानुसार या महिलेला स्थानबद्धतेचे आदेश देण्यात आले. या महिलेला अकोला मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
ही कारवाई शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ संजय सपकाळे, सुशील चौधरी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ सुनील दामोदरे, राजेश चव्हाण, विजय खैरे, पोलिस नाईक रेवानंद साळुंखे, विनोद सूर्यवंशी, रवींद्र चौधरी, पोकॉ उमेश पवार, ईश्वर पाटील, इरफान मलिक. राजश्री पवार आदींनी कारवाई केली.