- विलास बारीजळगाव - गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट सुरू आहे. तापमान ४५ अंशापर्यंत पोहचले आहे. या काळात कामगारांना तसेच विद्यार्थ्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दि. २५ मे ते ३ जून या कालावधीत कामगारांकडून उन्हात काम करून घेऊ नये तसेच खासगी कोचिंग क्लासेसच्या वेळेत बदल करण्याचे आदेश काढले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ३ जूनपर्यंत कामगारांकडून उन्हात काम करून घेता येणार नाही. ज्या ठिकाणी अत्यावश्यक काम असेल अशा ठिकाणी कामगारांना काम करण्यासाठी पुरेसे शेड तयार करावे किंवा कूलरची व्यवस्था करावी, असे आदेश काढले आहेत. याबाबत काही एक तक्रार असल्यास संबंधित ग्रामपंचायत, नगरपरिषद, पोलिस विभागाकडे करता येणार आहे.
खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी सकाळी १० वाजेपर्यंत कोचिंग सेंटर चालवावे. त्यानंतर कोचिंग सेंटर सुरू ठेवायचे असल्यास त्यात पुरेसे पंखे, कूलरची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे आदेश दिले आहेत.