- विलास बारी जळगाव - शिवाजीनगर उड्डाणपुलाकडून शहरात गावठी कट्टा घेऊन येत असलेल्या किरण दिलीप सपकाळे (३४, रा. गेंदालाल मिल) या तरुणाला शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी कट्टा, चार जीवंत काडतूस जप्त केले. ही कारवाई शुक्रवार, २७ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिले. त्यानुसार शुक्रवारी पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार बशीर तडवी, पोहेकॉ विजय निकुंभ, राजकुमार चव्हाण, प्रफुल्ल धांडे, उमेश भांडारकर, संतोष खवले, पोलिस नाईक किशोर निकुंभ, योगेश पाटील, पोकॉ रतन गिते, तेजस मराठे, योगेश इंधाटे यांनी सापळा रचून उड्डाणपुलाजवळून किरण सपकाळे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि ४ जिवंत काडतूस जप्त केले. या प्रकरणी पोकॉ तेजस मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किरण सपकाळे याच्या विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रफुल्ल धांडे करीत आहेत.