जळगाव : जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीबाबत वेगवेगळ््या पक्षांकडून दावे-प्रतिदावे होत असले तरी अध्यक्षपदाबाबत भाजपमध्येच रस्सीखेच असल्याचे चित्र सध्यातरी आहे. अध्यक्षपदाचे नाव निश्चित करण्यासाठी २ जानेवारी रोजी माजी मंत्री एकनाथराव खडसे व गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत नाव निश्चित झाले तरी भाजपच्या रंजना पाटील व पल्लवी सावकारे यांचे अर्ज कायम राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत महाविकास आघाडीकडून पर्यायाने राष्ट्रवादीकडून होणारे प्रयत्न, भाजपकडून थेट शिवसेना सदस्यांशी संपर्क साधून होणारी विचारपूस तर राष्ट्रवादीच्या संपर्कात असलेले भाजपचे तीन सदस्य पुन्हा भाजपच्या गोटात सहभागी झाल्याचेही वृत्त या सर्वांमुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीबाबत दावे-प्रतिदावे केले जात आहे.एकीकडे शिवसेना वगळता सर्वच पक्षाचे सदस्य सहलीवर असताना भाजपची २ जानेवारी रोजी जळगावात बैठक होणार आहे. एकनाथराव खडसे, गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार असून त्यास भाजपचे इतर पदाधिकारीही उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली. या बैठकीत अध्यक्षपदाचे नाव निश्चित होणार आहे. हे नाव निश्चित करताना खडसे व महाजन गटाचे संतूलन साधण्याचा प्रयत्न होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र असे असले तरी अध्यक्षपदासाठी दावेदारी करणाऱ्या भाजपच्या सदस्या रंजना पाटील व पल्लवी सावकारे यांचे अर्ज कायम राहणार आहे. परिणामी भाजपमधीलच रस्सीखेचमुळे अध्यक्षपदाची बिनविरोध निवड होण्याची शक्यता धुसर झाली आहे.‘कुठ-कुठ जायचा सहलीला.......’भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे सदस्य सध्या सहलीवर असून सर्व पक्षाचे सदस्य वेगवेगळ््या ठिकाणी असल्याचे सांगितले जात आहे. यात भाजपचे सदस्य मुंबई, अलिबाग, नाशिक येथे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सदस्य कुठे-कुठे सहलीवर आहे, याची उत्सुकता इतर पक्षांना लागली आहे.आज रात्री परतणार सदस्यसहलीवर गेलेले सर्व सदस्य वेगवेगळ््या ठिकाणी असल्याचे सांगितले जात असले तरी सर्व सदस्य २ जानेवारी रोजी रात्री जळगावात परतणार असल्याची माहिती मिळाली. मात्र तो पर्यंत शिवसेनेची बैठक होण्यासह २ रोजी भाजपची बैठक होऊन खलबत्ते सुरू राहणार आहे, एवढे मात्र निश्चित.
जळगाव जि.प. अध्यक्ष निवडीचा वाढला सस्पेंस...., भाजपमध्येच रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 12:09 PM