लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जि.प.ला मोठ्या प्रमाणात निधी देऊनही वेळेत निधी खर्च होत नसल्याच्या तक्रारी वाढतच असल्याने आता जि.प.च्या बांधकाम विभागाचे दोन विभाग करण्याचा ठराव शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करण्यात आला. १५ तालुक्यांचा जिल्हा असल्याने व त्या तुलनेत मनुष्यबळ नसल्याने कामे होत नसल्याचा मुद्दा समोर आला व पूर्व तसेच पश्चिम असे विभाग करण्याचा ठराव करण्यात आला.
जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी झाली. याही बैठकीत जिल्हा परिषदेच्या अखर्चिक निधीचा मुद्दा गाजला.
जि.प. यंत्रणेवर विश्वास नाही, कोणाच्या दबावाखाली काम चालते?
२०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्याला ३७५ कोटी रुपयांचा निधी मिळाला असला तरी तो खर्च होत नसल्याची ओरड आहे. जि.प. कडे तर गेल्या वर्षाचा ६३ कोटींचा निधी शिल्लक असल्याचे समोर आल्याने शुक्रवारी झालेल्या बैठकीतदेखील सर्वच लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. यात आमदार अनिल पाटील यांनी जि.प. यंत्रणेवर कोणाचाही विश्वास राहिलेला नाही असे सांगत दोन महिन्याच्या कामाला तीन वर्षे लागतात, असा आरोप केला. यात प्रत्येक टेबलवर फाईली पडून राहतात, असेही त्यांनी नमूद केले. यामुळे नागरिक शिव्या घालतात, अशा शब्दात नाराजी व्यक्त केली. यानंतर आमदार किशोर पाटील यांनीदेखील जि.प.मध्ये कायद्याला धरून काम चालते की कोणाच्या दबावाखाली जि.प. चालते असा सवाल केला. एक निविदा तर वेळेत भरूनही तिला नाकारण्यात आल्याचा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगत कामकाजाबाबत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनाही या बाबत विचारणा केली. आमदार संजय सावकारे यांनीदेखील निधी परत जात असल्याच्या तक्रारी कायम असल्याने कोणावरही कारवाई होत नाही. त्यामुळे असेच सुरू राहणार का? असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे ही कामे इतर यंत्रणांना देण्याची मागणी आमदारांनी केली.
आमदार, जि.प. सदस्य असे पडले गट
आमदारांनी जि.प.च्या यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केल्याने जि.प. सदस्य प्रभाकर सोनवणे, नानाभाऊ महाजन यांच्यासह इतरही जि.प. सदस्य उभे राहिले व जि.प.कडे पुरेसी यंत्रणा नसल्याने जि.प.च्या बांधकाम विभागाचे दोन विभाग करावे व तसा ठराव करावा, अशी मागणी केली. त्यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही ठराव करून घ्या, असे निर्देश दिले.
त्यामुळे आता दोन लोकसभा मतदार संघाप्रमाणे जि.प.च्या बांधकाम विभागाचे पूर्व व पश्चिम असे दोन विभाग होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
निधी खर्च करण्यास मदतवाढ द्या
जिल्ह्याला ३७५ कोटींचा निधी मंजूर झाला होता. मात्र नंतर कोरोनामुळे ६७ टक्के कपात करण्यात आली. आता १०० टक्के निधी उपलब्ध झाल्याने तो ३१ मार्चपर्यंत खर्च करावा लागणार आहे. मात्र आता केवळ दोन महिनेच शिल्लक असल्याने हा खर्च करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ मिळावी,अशी मागणी करण्यात आली. त्यावर आपण ही मागणी राज्य सरकारकडे नोंदवू, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.