जळगाव : अपघातानंतर महामार्ग रोखणे व मृतदेह उचलू देण्यास प्रतिबंध करुन त्याची अवहेलना करणे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांना चांगलेच महागात पडले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवारी पहाटे साडे तीन वाजता लालचंद पाटील, नशिराबादचे सरपंच विकास पाटील, योगेश उर्फ पिंटू पाटील, भिका राजाराम (पूर्ण नाव समजू शकले नाही), पुष्पराज रोटे व आप्पा गंगाराम (पूर्ण नाव समजू शकले नाही) यांच्यासह इतर सहा ते सात जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी श्रीकांत धनराज बदर यांनी फिर्याद दिली.हॉटेल कारागिर दगडू उर्फ बाळू देविदास पाटील या तरुणाला बुधवारी रात्री कंटेनरने चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर लालचंद पाटील, विकास पाटील यांच्यासह इतरांनी रस्त्यावर ठिय्या मांडून रास्ता रोको आंदोलन केले होते. यावेळी महामार्ग दोन तास बंद झाला होता, पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ, सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन, उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सहायक फौजदार अतुल वंजारी, गोविंदा पाटील, जितेंद्र राजपूत, तुकाराम निंबाळकर, सचिन पाटील, लुकमान तडवी, इम्रान सय्यद व नशिराबादचे सहायक निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात रवाना करुन पहाटे तीन वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत केली.या घटनेनंतर याच दोघं पोलिसांनी नशिराबाद पोलिसांशी संपर्क करुन अपघातग्रस्त कंटेनर अडविण्याचे सांगितले होते. त्यानुसार हा कंटेनर (क्र.डब्लु.बी.१७-४३१९) नशिराबादला अडविण्यात आला. चालक पंकज कुमार यादव (२६, रा.मायापुर, जि.नवाडा, बिहार) याला ताब्यात घेण्यात आले. सायंकाळी अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील तपास करीत आहेत.ते पोलीस ‘अप-डाऊन’ करणारेघटना घडली तेव्हा दोन पोलीस ड्युटी आटोपून दुचाकीने भुसावळकडे जात होते. अपघात झाला तेव्हा ते तेथे थांबले. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी जखमीला जिल्हा रुग्णालयात हलविण्यासाठी रुग्णवाहिका बोलवा म्हणून लालचंद पाटील यांनी या पोलिसांना सांगितले, मात्र दुचाकीवरील व्यक्ती मृत झाला असून वाहतूक सुरळीत करणे आवश्यक असल्याचे या पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे लालचंद पाटील व पोलिसांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली. गर्दी जमा झाल्याने ते दोघं पोलीस निघून गेले, त्यानंतर लालचंद पाटील व इतरांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी आपणास सांगितल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
महामार्ग रोखणे पडले महागात.... जळगाव जि.प.उपाध्यक्ष, नशिराबाद सरपंचासह १३ जणांविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 12:51 PM