आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २२ - जि. प. शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांबाबत अनेक तक्रारी येत असताना शासकीय कामकाजाचा एक अजब नमुना पुढे आला आहे. शाळाच नसलेल्या गावात एका शिक्षकाची बदली झाली असल्याने एका शिक्षकापुढे मोठा पेच उभा राहिला आहे.या अजब प्रकाराबाबत राष्ट्रवादी शिक्षक संघाने दिलेल्या निवेदनानुसार माहिती अशी की, ज्या गावात शाळाच नाही, त्या गावाचे नाव बदलीसाठीच्या यादीत देण्यात आले होते. यामुळे पळासखेडे सीम ता. पारोळा या शाळेतील शिक्षक दुर्गादास कोळी यांनी यादीसनुसार अमळनेर तालुक्यातील लोणतांडा हे गाव बदलीसाठी मागितले. हे गाव त्यांना मिळालेही. परंतु या गावात शाळाच नसल्याने विस्थापीत होण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.याबाबत राष्ट्रवादी शिक्षक संघाच्यावतीने जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले असून योग्य निर्णय न झाल्यास २८ मे रोजी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.आॅनलाईन घोळप्रकरणी प्राथमिक शिक्षक संघ न्यायालयात धाव घेणार आहे. याबाबत जळगावात सोमवारी जिल्हाध्यक्ष रवींद्र सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
शाळा नसलेल्या गावी झाली बदली, जळगाव जि.प.चा अजब कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 11:44 AM