जळगाव : शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून अधिकचा नफा देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या दोघांना जळगाव सायबर पोलिसांनी अटक केली. यामध्ये क्रिप्टोकरन्सी वॉलेट वापरणारा मोहम्मद मसरूर इज्राईल याला दिल्लीतून तर बँकेचे खाते कमिशनवर देणाऱ्या अनिल कुमार याला राजस्थान येथून अटक केले. या फसणूक करणाऱ्यांमध्ये मोहम्मद मसरूर इज्राईल याचा युक्रेनमध्ये राहणारा भाऊ मोहम्मद मशकूर आलम याचाही समावेश असल्याचे तपासात समोर आले आहे.गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाईन पद्धतीने आर्थिक फसणुकीचे प्रकार समोर येत आहे. यात या पूर्वी देशातील वेगवेगळ्या भागातून सायबर ठगांना पोलिसांनी अटक केली. त्यात आता या ऑनलाईन फसवणूक प्रकरणांमध्ये विदेशातूनही फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे.शेअर ट्रेडिंगमध्ये तक्रारदाराला अधिकचा नफा देत नंतर गुंतवलेल्या मोठ्या रकमेवर कोणताही नफा अथवा मुद्दल रक्कम परत न दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास करीत असताना क्रिप्टोकरन्सी वॉलेट वापरणारा मोहम्मद मसरूर इज्राईल याला सायबर पोलिसांनी दिल्लीतील कपासहेडा भागातून अटक केली.
युक्रेनमधून हाताळायचा व्यवहारमोहम्मद मसरूर इज्राईल याला सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोउनि दिगंबर थोरात, पोहेकॉ प्रवीण वाघ, राजेश चौधरी, दिलीप चिंचोले, दीपक सोनवणे, पोकॉ गौरव पाटील व मिलिंद जाधव यांनी दिल्लीतून अटक केल्यानंतर त्याची चौकशी करत असताना या फसणूक प्रकरणात त्याचा युक्रेन येथे राहणारा भाऊ मोहम्मद मशकूर आलम याचाही समावेश असल्याचे समोर आले. मोहम्मद मशकूर हा युक्रेनमध्ये राहून ऑनलाईन पद्धतीने व्यवहार हाताळत होता. त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अगोदर १४ लाख नफ्याचे अमिष नंतर कोटीत फसवणूकदुसऱ्या गुन्ह्यात तक्रारदाराला गुंतवणूक रकमेवर १४ लाख रुपयांचा नफा देत विश्वास संपादन केला. नंतर पुन्हा एक कोटी पाच लाख २३ हजार रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर मोबदला मिळत नसल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान राजस्थानमधील बाडमेर येथील अनिल कुमार याला ताब्यात घेतले. तो त्याचे करंट बँक खाते कमिशनवर गुन्हे करणाऱ्यांना पुरवित असल्याचे समोर आले. त्यांच्याकडून मोबाइल, सीमकार्ड साहित्य जप्त करण्यात आले.अटक केलेल्या दोघांना न्यायालयात हजर केले असता मोहम्मद मसरूर इज्राईल याला ६ मेपर्यंत तर अनिल कुमार याला ८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.