भारतीय अभिजात संगीताचा खान्देशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून नावारूपाला आलेल्या १९ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाला शुक्रवारी सायंकाळी शानदार सुरुवात झाली. छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात ३ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपमहाव्यवस्थापक मुकेश सिंग, विभागीय व्यवस्थापक विक्रांत नेगी, बँक ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर राजेश देशमुख, युनियन बँकेचे व्यवस्थापक मनोज कुमार, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर, दीपिका चांदोरकर, अरविंद देशपांडे, सेवानिवृत्त प्रा. शरदचंद्र छापेकर उपस्थित होते.
शरयू दातेंनी मिळवली जळगावकरांची दाद :
या महोत्सवाच्या सुरुवातीला मुंबई येथील शास्त्रीय व उपशास्त्रीय गायिका शरयू दाते यांनी शास्त्रीय गायन, नाट्यगीत व किशोरी अमोणकर यांचा अजरामर झालेला ‘बोलावा विठ्ठल’ हा अभंग सादर केला. तत्पूर्वी सुरुवातीला विलंबित ‘तीन ताल आली रे फलक लागी’ व त्यानंतर पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी बंदिश ‘मोरा मन बस कर लिनो श्याम’ हे सुरेल गीत सादर केले. त्यानंतर संवादिनीवादक मिलिंद कुलकर्णी यांनी रचित ‘सजन बिना ना लागे जिया मोरा हेै’ हे भजन सादर केले. या गाण्याला तबल्याची साथ दिली तारूदत्त फडके यांनी, तर संवादिनीवर मिलिंद कुलकर्णी यांनी साथ दिली. अशाप्रकारे शरयू दाते यांनी एकाहून एक सुरेल गीते सादर करून जळगावकरांची दाद मिळवली.
तद्नंतर दुसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध बासरीवादक आश्विन श्रीनिवासन यांनी राग जिंजोटीमध्ये विलंबित खयाल बंदिशवर तरणा सादर केला. त्यानंतर नाट्यसंगीत घेई छंद मकरंद सादर केले व रसिकांची दाद मिळवली. सत्रात शेवटी संजय दास यांच्यासोबत गिटार व बासरीचे फ्युजन सादर केले. महोत्सवाचे सूत्रसंचालन दीप्ती भागवत यांनी केले.