जळगावकरांना सर्वात जास्त आवडतो १ नंबर
आरटीओच्या तिजोरीत दरवर्षी जमा होतात दोन कोटी
जळगाव : हौसेला मोल नाही, असे म्हणतात. त्यासाठी अनेक जण हवी ती किंमत मोजतात. असाच प्रकार वाहनांच्या क्रमांकाबाबत घडला आहे. आपल्या वाहनावर अमूक क्रमांक असावा, यासाठी सामान्यांसह लोकप्रतिनिधी, उद्योजक व सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लाखो रुपये भरुन पसंती क्रमांक (चॉईस नंबर) घेतला आहे. एकट्या पसंती क्रमाकांने आरटीओच्या तिजोरीत दीड वर्षात तब्बल २ कोटी ७७ लाख रुपयांची गंगाजळी भरली आहे.
०००१ या क्रमांकासाठी दोन महिन्यापूर्वीच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डॉ. हर्षल माने यांनी एक लाख रुपये भरले तर ७७७७ या क्रमांकासाठी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी २ लाख १० हजार रूपये भरले आहेत. याआधी देखील डॉ. माने यांनी अशीच रक्कम भरुन क्रमांक घेतला आहे. जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनीही काही वर्षापूर्वी ०००१ क्रमांकासाठी तीन लाख रुपये भरले होते.
दरम्यान, जो क्रमांक पसंतीच्या यादीत नाही, परंतु विशिष्टच क्रमांकासाठी २ हजार ५९३ लोकांनी हट्ट धरला व त्यासाठी तब्बल १ कोटी ३ लाख ९३ हजार रुपये तिजोरीत भरले. बहुतांश जणांनी स्वत:चा वाढदिवस, कुटुंबातील मुलगा, मुलगी, पत्नी किंवा आई, वडील यांचा जन्मदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस असेल तर तो क्रमांक वाहनाच्या क्रमांकात घेतला आहे. काहींनी देवाचे किंवा कुळ, समाजाला त्यातून अधोरेखित केलेले आहे. आमदार, खासदार, उद्योजक, सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषदेचे सदस्य यांना देखील हा मोह आवरता आलेला नाही.
या तीन नंबर्सना सर्वाधिक रेट
०००१ : तीन लाख रुपये
७७७७ : दोन लाख रुपये
९९९९ : दीड लाख रुपये
या तीन नंबर्सना सर्वाधिक मागणी
१९१९
७१७१
७७७
आरटीओची कमाई
२०१८ : २,३४,५०,५००
२०१९ : २,१७,८४,५००
२०२० : २,०९,६८,०००
..तर नंबरसाठी होतो लिलाव
एका नंबरसाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविली जाते. बंद पाकिटात अर्ज मागविले जातात. त्यानंतर तारीख निश्चित करुन सर्व अर्जदारांसमोरच हे पाकीट उघडले जातात. ज्या व्यक्तीने सर्वाधिक रक्कम भरली असेल त्या व्यक्तीला हा नंबर दिला जातो. त्यादिवशी एखादा क्रमांक चारचाकीत शिल्लक नसेल तर तो क्रमांक दुचाकीतूनही देता येतो, मात्र त्यासाठी जास्तीचे शुल्क आकारले जाते.
कोरोना काळातही हौसेला मोल नाही
कोरोना काळात लॉकडाऊनमधील एप्रिल ते जुलै या चार महिन्यात १९ लाख ६७ हजार रुपये पसंती क्रमांकातून मिळाले आहेत. याच चार महिन्यात गेल्या वर्षी ६५ लाख ५० हजार रुपये आरटीओला मिळाले होते. चालू ऑगस्ट ते सप्टेंबर या दीड महिन्यात तब्बल ३७ लाख ८ हजार ५०० रुपये तिजोरीत जमा झालेले आहेत. दोन महिन्यात उत्पन्नात वाढ झाली. गेल्या वर्षी १५ टक्के वाहन नोंदणी कमी असतानाही भरमसाठ उत्पन्न मिळाले होते.
कोट...
पसंती क्रमांकासाठी शासनाने दर निश्चित केलेले आहेत. साधारण क्रमांकासाठी ५ हजार तर व्हीआयपी क्रमांकासाठी १ ते ३ लाखापर्यंत दर आहेत. एका वाहनाच्या सिरीजमध्ये क्रमांक शिल्लक नसला तरी दुसऱ्या वाहनातून घेता येतो, मात्र त्याला तीन पट रक्कम भरावी लागते. दीड वर्षात पावणे तीन कोटी रुपये निव्वळ पसंती क्रमांकातून मिळालेले आहेत.
-श्याम लोही, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,
--