जळगाव येथे विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत स्पर्धकाचा राडा, पोलीस बंदोबस्तात पार पडली स्पर्धा
जळगाव : येथे सुरू असलेल्या विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत जळगाव जिल्हा संघाचा खेळाडू रोशन सोनवणे याने आपल्यावर पंचांकडून अन्याय झाल्याचा दावा करत शुक्रवारी सकाळी रिंकमध्ये ठाण मांडले. त्यानंतर त्याच्या सहकाºयांनी आणि स्थानिक प्रशिक्षकांनी पुढचे सामने होऊ न देण्याचा इशारा दिला. पोलिसांनी हस्तक्षेप करत सोनवणेला रिंकच्या बाहेर काढले आणि उर्वरित सामन्यांना सुरुवात झाली.
जळगाव जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन आणि जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत गुरुवारी १७ वर्षा आतील गटात अंतिम फेरीत रोशन सोनवणे याचा सामना धुळे जिल्हा संघाच्या खेळाडूसोबत होता. पंचांनी विजयी घोषित केले. मात्र रोशन सोनवणे याने पंचांच्या निर्णयावरच आक्षेप घेतले. रोशन याने आपणच विजयी असून पंचांनी पक्षपात करत धुळे जिल्हा संघाच्या खेळाडूला विजयी घोषित केल्याचा दावा केला. मात्र क्रीडा कार्यालय आणि संघटनेच्या पदाधिकाºयांनी त्याला पंचांचा निर्णय अंतिम असल्याचे सांगितले. रोशन याने सामना पुन्हा खेळवण्याची किंवा आपल्याला थेट विजयी घोषित करण्याची मागणी केली. ही मागणी मान्य झाली नाही.
त्यानंतर शुक्रवारी सकाळी १९ वर्षाआतील गटाचे सामने सुरू होण्यापूर्वीच सोनवणे आणि त्यासोबत असलेल्या खेळाडू आणि प्रशिक्षकांनी पुन्हा गोंधळ घालत त्याला विजेता घोषित करण्याची मागणी केली. रोशन थेट बॉक्सिंग रिंकमध्येच जाऊन बसला. त्यामुळे क्रीडा कार्यालयाकडून पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेर दीड तासानंतर रोशनला रिंकबाहेर काढण्यात आले.
रोशन हा भुसावळ येथील डी.एस. हायस्कूलचा विद्यार्थी आहे. दोन्ही दिवस वाद सुरू असताना शाळेचे क्रीडा शिक्षक उपस्थित नव्हते.
या सामन्यात आपण एकतर्फी खेळ केला. मात्र तरीही प्रतिस्पर्धी धुळे जिल्हा संघाच्या खेळाडूला विजेता घोषित करण्यात आले. पंचांनी हा पक्षपात केला असून पुन्हा बाऊट घ्यावा किंवा आपल्याला थेट विजेता घोषित करावे.
- रोशन सोनवणे