कुंदन पाटील
जळगाव : मूक जनावरांच्या वेदना... व्यक्त न करता येणारं दुखणं... निदानाअभावी आजाराने पाय पसरवतच जाणं... या साऱ्या अडथळ्यांच्या प्रवासात येथील पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाने सुखकर वाट शोधून काढली आहे. कार्यालयातील नादुरुस्त व निष्क्रिय उपकरणांच्या माध्यमातून तज्ज्ञांकरवी प्रयोगशाळा उभी केली आहे. या प्रयोगशाळेत रक्तासह विविध चाचण्या करण्याच्या सोयी उपलब्ध झाल्याने जनावरांमधील आजारांचे २४ तासांतच निदान व्हायला लागले आहे. राज्यात जिल्हास्तरावरची अशाप्रकारची ही पहिलीच प्रयोगशाळा ठरली आहे.
जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय या नावाने या प्रयोगशाळेने राज्यात ओळख निर्माण केली आहे. यापूर्वी जनावरांमधील आजारांच्या निदानासाठी रक्तासह विविध नमुने नाशिक किंवा पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविले जात होते. त्याच्या अहवाल प्राप्तीसाठी आठवडाभराचा कालावधी लोटला जात होता. परिणामी उपचाराअभावी अनेक जनावरांचा मृत्यू होत होता. त्यामुळे येथील पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाने पुढाकार घेतला आणि ‘टाकाऊ’ उपकरणांच्या माध्यमातून ही यंत्रणा उभी केली आहे.
अशा आहेत सुविधा...‘हिमॅटो ॲनालायझर’ : या माध्यमातून रक्त चाचण्या केल्या जातात. तसेच संवदेनशील प्रतिजैविक चाचण्यांच्या माध्यमातून जनावरांमधील रक्तजल व रक्ताचे नमुने घेतले जातात. हिमोग्लोबीनसह रक्तातील विविध घटकांचा अभ्यास या चाचणीतून होतो. बायोकेमिकल ॲनालायझर : या माध्यमातून यकृत व मूत्रपिंडांची तपासणी केली जाते. या दोन्ही अवयवांची कार्यक्षमताही स्पष्ट केली जाते.
अँटिबायोटिक सेन्सिटिव्ह टेस्ट : प्रतिजैविक (अँटिबायोटिक) जास्त प्रमाणात वापरल्यामुळे झालेल्या दुष्परिणांना ओळखण्यासाठी ही चाचणी पूरक ठरते. या चाचणीमुळे प्रतिजैविकांचा मर्यादितच वापर होतो. काचपट्टी चाचणी : रक्त नमुन्यांच्या अन्य चाचण्यांसाठी काचपट्टीची सुविधा आहे. परजीवींमुळे होणाऱ्या आजारांचे तत्काळ निदान होते.
जिल्हास्तरावर हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. शासनानेही या अभिनव प्रयोगाला बळ दिले. राज्यातील अन्य जिल्हेही ‘जळगाव पॅटर्न’साठी पुढाकार घेत आहेत. आता तालुकापातळीवरही या प्रयोगशाळा उभ्या करण्याचा प्रयत्न आहे. -डॉ. एस. पी. पाटील, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन विभाग