ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 20 - नवरात्रोत्सवास गुरुवारपासून प्रारंभ होत असून आदिशक्तीच्या स्वागतासाठी जळगावकर सज्ज झाले आहेत. विविध साहित्याच्या खरेदीसाठी बुधवारी मंडळाचे कार्यकर्ते आणि भक्तगणांनी बाजारपेठ फुलली होती. बुधवारी सानेगुरुजी रुग्णालयाच्या जागेवर विविध साहित्यांची दुकाने थाटण्यात आली असून तेथे खरेदीसाठी उत्साह दिसून येत होता. या ठिकाणी बुधवारी सकाळपासूनच खरेदीसाठी गर्दी झाली होती. संध्याकाळी त्यात आणखी भर पडली. त्यात संध्याकाली सहावाजेपासून पावसाला सुरूवात झाल्याने ग्राहकांसह विक्रेत्यांची मोठी तारांबळ उडाली. घटस्थापनेसाठी लागणारे लहान-मोठय़ा आकारातील घट बाजारात दाखल झाले असून त्यांची किंमत 30 ते 50 रुपये प्रति नग आहे. विशेष म्हणजे घट विविध रंगातदेखील आले आहेत. गुजराती बांधव जे घट स्थापन करतात त्यासाठी रंगीत घट वापरले जातात. त्यांना गरबा असे म्हटले जाते. काही मंडळ मोठे घट घेतात. या सोबतच मातीची धूपदाणी, दिवा या वस्तूही दाखल झाल्या आहेत. या सोबतच घट ज्यामध्ये स्थापन केला जातो त्या टोपलीचे भावदेखील चांगलेच वधारले आहे. या टोपल्यादेखील 30 ते 50 रुपये प्रति नग आहे. एरव्ही टोपली व केरसुणीचे भाव कमी असतात, मात्र नवरात्रीपासूनच त्यांचे भाव वाढू लागतात. लाल मदरा व त्यासोबत चमकीची झालर असलेले कापड, नारळ, घटाची तयार पूजा, पाच फळे, ङोंडूची फुले, नागवेलीची पानदेखील बाजारात उपलब्ध झाली होती. बुधवारी दुपार्पयत अमावस्या असल्याने अनेकांनी मूर्ती घेणे टाळले. अमावस्या टाळून अनेकजण गुरुवारी सकाळीच मूर्ती खरेदी करणार असल्याने मूर्ती बाजारात आज काहीशी शांतता होती. घरी देवीची स्थापना करण्यासाठी लहान मूर्तीदेखील बाजारात आलेल्या आहे. विविध रुपातील लहान मोठय़ा मूर्ती 200 ते 500 रुपयांर्पयत उपलब्ध असून साडेतीन फुटार्पयतची मूर्ती 1000 ते 1100 रुपयांना आहे.