जळगाव : जळगाव शहरात महापालिकेच्या केंद्रांवर होणाऱ्या तपासण्यांची संख्या तिपटीने वाढली असताना दुसरीकडे यात बाधित येणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र घटली आहे. गेल्या आठवडाभरापासून हे दिलासादायक चित्र असून, ही पॉझिटिव्हिटी ४० टक्क्यांवरून थेट दहा टक्क्यांवर आली आहे. शहरात कोरोना रुग्णवाढीचा आलेख आता घसरत असल्याचे या आकडेवारीवरून समोर येत आहे.
जिल्हाभरात मध्यंतरी सर्वाधिक रुग्ण हे जळगाव शहरात आढळून येत होते. यात ही रुग्णसंख्या एका दिवसाला थेट ४०० पर्यंत नोंदविली गेली होती. मात्र, हळूहळू संसर्गाचे प्रमाण घटत असून, आता हीच संख्या अडीचशेपेक्षा कमी नोंदविण्यात येत आहे. शहरातील संसर्गाचे प्रमाण घटत असल्याचे समोर येत आहे. यात हॉटस्पॉट टेस्टिंग, रस्त्यांवर फिरणाऱ्यांच्या चाचण्या, वेगवेगळ्या कॅम्पच्या माध्यमातून तपासण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे.
...अशी आहे पॉझिटिव्हिटी
सोमवार : चाचण्या ९३७, बाधित ९५, पॉझिटिव्हिटी १०.३९ टक्के
मंगळवार : चाचण्या ९५०, बाधित ९५, पॉझिटिव्हिटी १० टक्के
बुधवार : चाचण्या १,५०९, बाधित १२८, पॉझिटिव्हिटी ८.१८ टक्के
गुरुवार : चाचण्या १,६९८, बाधित ११०, पॉझिटिव्हिटी ६.४७ टक्के
शुक्रवार : चाचण्या १,१००, बाधित ८८, पॉझिटिव्हिटी ८ टक्के
शनिवार : चाचण्या ७९९, बाधित ८४, पॉझिटिव्हिटी १०.५१ टक्के
काही दिवसांपूर्वी
पॉझिटिव्हिटी : ३५ ते ५० टक्के (शंभर अहवालांमध्ये ४० पर्यंत रुग्ण आढळून येत होते.)
आता पॉझिटिव्हिटी ६ ते १० टक्के, शंभर अहवालांमध्ये ६ ते १० रुग्ण आढळून येत आहेत.
कारणे
१) शहरातील संसर्गाचे प्रमाण घटत आहे.
२) चाचण्यांची संख्या वाढवून बाधितांना विलग केले जात आहे.
३) लॉकडाऊनचा परिणाम समोर येत आहे.
मात्र, हे लक्षात असू द्या...
कोरोनाचा संसर्ग कमी होत असला, रुग्णसंख्या कमी होत असली तरी रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण त्या तुलनेत घटले नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. याला कारणे म्हणजे वेळेवर तपासणी न करणे. यासाठी लक्षणे जाणवल्यास पहिल्याच दिवशी तपासणी करा. बाधित आढळले तर शासकीय नियमानुसार उपचार घ्या, निगेटिव्ह आल्यास नियमित उपचार घ्या, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पाटील यांनी केले आहे. अन्य व्याधी असलेले रुग्ण लवकर तपासणी करीत नाहीत व त्यांचे गंभीर होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे लवकर तपासणी करून घेतल्यास रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण कितीतरी पटींनी कमी होईल, असेही डॉ. पाटील यांनी म्हटले आहे.