लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या १९ वर्षाआतील उत्तर विभागीय क्रिकेट स्पर्धेत दुसऱ्या सामन्यात जळगावने धुळेवर विजय मिळवला. पहिल्या सामन्यात जळगावने नंदुरबारला नमवले होते. जळगावचा संघाचा हा सलग दुसरा विजय आहे. जळगावने दिलेले १८३ धावांचे आव्हान धुळ्याला पेलवले नाही. धुळ्याचा संघ १६८ धावातच बाद झाला. हा सामना शिरपूर येथे गुरुवारी पार पडला.
जळगावने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यात नीरज जोशी दहा धावा करून बाद झाला. मात्र दुसरा सलामीवीर प्रसन्न नीळे याने ८० चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याने ५४ धावा केल्या. कुणार पवार याने २०, कर्णधार नचिकेत ठाकूर व आशुतोष मालुंजकर यांनी प्रत्येकी १५ धावांचे योगदान दिले. तर जेसल पटेल याने २२ धावा केल्या. जळगाव संघाने सर्वबाद १८३ धावा केल्या. धुळ्याच्या प्रतीक शिंदे याने ३, तर समेक जगताप याने दोन बळी घेतले. मितेश बन्सल, प्रथमेश कुंवर, दानिश पटेल आणि प्रतिक सोनवणे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
प्रत्युत्तरात धुळ्याचा संघ १६८ धावातच बाद झाला. सलामीवीर अनुराग वाघ याने ३७ तर समेक जगताप याने ३९ धावा केल्या. मात्र त्यानंतर इतर फलंदाज फारशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत. त्यामुळे धुळ्याच्या संघाला पराभव स्वीकारावा लागला. जळगावच्या नीरज जोशी याने २२ धावा देत चार बळी घेतले. तर आशुतोष मालुंजकर याने एक बळी मिळवला. नीरज जोशीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. साखळी स्पर्धेतील जळगाव संघाचा अखेरचा सामना शनिवारी नाशिक विरोधात शिरपूर येथेच होणार आहे.