जळगाव : रामानंद परिसरातील एका निराधार वृद्धाच्या निधनानंतर परिसरातील नागरिकांनी माणुसकी दाखवून तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास पुढाकार घेतला. मात्र बुधवारी रात्री स्मशानभूमीत मनपाचा कोणीही कर्मचारी उपस्थित नसल्याने पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तब्बल साडेतीन तास प्रतीक्षा करावी लागली. तळीराम मनपा कर्मचा-याच्या तल्लफने हा संतापजनक प्रकार घडला, तो संतप्त नागरिकांनी ‘लोकमत’कडे कळविला.
पार्वतीनगरात राहणारे उत्पल डे (वय ६०) यांचे बुधवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास हृदयविकारामुळे निधन झाले. डे यांचे या भागात मुलगी व जावई वगळता कोणीही नातेवाईक नाही. यामुळे रामानंदनगर परिसरातील नागरिकांनी लोकवर्गणी गोळा करून नेरीनाका स्मशानभूमीत पूर्व सूचना देत त्यांचे पार्थिव रात्री १० वाजता आणले. मात्र त्यानंतरही रात्री पार्थिव आणले असता स्मशानभूमीत कोणीही कर्मचारी हजर नव्हता. या दरम्यान महापालिकेत फोन करून कळविले. परंतु उपयोग झाला नाही. रात्री दीड वाजेपर्यंत कर्मचारी आलेला नव्हता. अखेरीस नागरिकांनी स्मशानभूमीतील कर्मचा-याला मद्याच्या दुकानावरून शोधून आणले. यानंतर रात्री 1.45 वाजण्याच्या अंत्यसंस्कार करण्यात आले.