जळगाव : मनपा निवडणुकीच्या प्रचाराला आता अवघ्या ३ दिवसांचा कालावधी उरला असल्याने उमेदवार व कार्यकर्त्यांची जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याची धावपळ सुरू आहे. काही ठिकाणी तर आतापासूनच पैसे वाटप सुरू झाले असल्याची चर्चा असून २५० ते ५०० रूपये फुलीपर्यंत दर पोहोचले असल्याची चर्चा आहे.मनपा निवडणुकीची घोषणा महिनाभर आधीच करण्यात आल्याने राजकीय पक्षांना व इच्छुकांना पूर्वतयारीला वेळच मिळाला नाही. माघारीनंतर प्रचाराला वेग आला. त्यामुळे प्रचारासाठी उमेदवार व कार्यकर्त्यांना जेमतेम दोन आठवड्यांचा अवधी मिळाला. मोठ्या प्रभागातील विविध वसाहतींमध्ये घरोघरी पोहोचण्यासाठी उमेदवारांना कसरत करावी लागत आहे. त्यातच निवडणूक खर्चाचे बंधन असल्याने जाहिरात, होर्र्डींग, रिक्षावरील प्रचार यांचे प्रमाण कमीच आहे. मतदानाला तीन दिवस उरले तरीही बाहेरगावाहून शहरात येणाऱ्या व्यक्तीला निवडणूक आहे, असे पटकन जाणवत नाही.गल्लीदादांनी गोळा केले निवडणूक कार्डमतदारांना पैसे घेऊन मतदान करू नये म्हणून शासनाकडून आवाहन केले जाते. मात्र त्याचा फारसा फरक कुणालाही पडलेला दिसून येत नाही. झोपडपट्टी भागात तर झोपडपट्टी दादांनी लोकांच्या या वृत्तीचा लाभ घेत त्यांच्याकडील मतदान कार्ड आठ दिवस आधीपासूनच गोळा करून घेतले असून तुम्हाला ५००-१००० रूपये फुली मिळवून देतो, असे आश्वासन दिले आहे. हेच झोपडपट्टी दादा संबंधीत प्रभागातील उमेदवारांकडे जाऊन त्यांना त्या गोळा केलेल्या मतदान ओळखपत्रांच्या गड्ड्या दाखवून पैशांची बोली लावत असल्याचे समजते.‘सीओपी’ किती उपयोगी ठरणार?राज्य निवडणूक आयोगाने मनपाच्या निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी नागरिकांना आपल्या मोबाईलमधूनच थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता यावी, यासाठी ‘सीटीझन आॅन पेट्रोल’ (सीओपी) हे मोबाईल अॅप आणले आहे. मात्र त्या मोबाईलचे लोकेशनवरूनच घटनास्थळ काढले जाणार असल्याने घटनास्थळावरून तक्रार नोंदविणे कितपत शक्य होईल? असा प्रश्न आहे. तसेच अन्य ठिकाणी जाऊन नंतर तक्रार करेपर्यंत पैसे वाटप करणारा तेथे थांबेलच याची शाश्वती नाही. त्यातच तक्रार केल्यानंतरही प्रशासनाचा कागदपत्रांचा घोळ कायमच आहे. त्यामुळे यंदा प्रथमच आणलेले हे मोबाईल अॅप कितपत यशस्वी ठरेल हे लवकरच स्पष्ट होईल.निवडणुकीदरम्यान गैरप्रकार आढळल्यास येथे करा तक्रारनिवडणुकीदरम्यान मतदारांना पैसे वाटप किंवा इतर भेट वस्तू देतानाचे गैरप्रकार आढळल्यास तक्रार करण्यासाठी मनपा प्रशासनाने विविध कक्षांची स्थापना केली आहे. मनपा व राज्य निवडणूक आयोगाकडून ‘सिटीजन पेट्रोलींग’ अॅप तयार करण्यात आले आहे. या अॅपवर तक्रार करण्यासाठी आधी ‘प्ले स्टोअर’ वरुन हे अॅप डाऊनलोड करून घ्यावे.आपल्या प्रभागात निवडणुकीदरम्यान काही गैरप्रकार आढळल्यास नागरिक या अॅपवरुन तक्रारी करु शकणार आहेत. या अॅपवरुन फोटो देखील नागरिकांना पाठविता येणार आहेत. तक्रार मिळाल्यानंतर तत्काळ संबधीत प्रभागातील पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली जाणार आहे. तसेच तक्रारदाराची सर्व माहिती गुप्त ठेवण्यात येणार आहे.या क्रमांकांवरही करु शकतात तक्रारीआचारसंहितेचा भंग होवू नये यासाठी स्वतंत्र आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला असून, आचारसंहिता कक्षाचे प्रमुख उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके हे आहेत. त्यांच्याकडे नागरिक तक्रार करु शकतात. त्यांच्या ७५८८७३६२८५ या क्रमांकावर नागरिक संपर्क साधू शकतात. यासह पोलीस कंट्रोल रुम ०२५७-२२२३३३३, मनपा तक्रार निवारण कक्ष ७९०००५१००० या क्रमांकावर देखील नागरिक निवडणुकीदरम्यान होणाºया गैरप्रकाराबाबत तक्रार करु शकणार आहेत.आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी मनपा व राज्य निवडणूक आयोगाने सिटीजन पेट्रोलींग अॅप तयार केले आहे. यावर नागरिक तक्रार करु शकणार आहेत. तसेच निवडणुकीदरम्यान काही गैरप्रकार आढळल्यास तक्रार निवारण कक्ष, आचारसंहिता कक्षावर देखील नागरिक आपली तक्रार करु शकणार आहेत. तसेच नागरिकांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता, गैरप्रकाराबाबत तक्रार करावी, त्यांची ओळख कुठेही सार्वजनिक केली जाणार नाही.-चंद्रकांत डांगे, मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी व मनपा आयुक्त
जळगाव मनपा निवडणूक : २५० ते ५०० रुपये ‘फुली’ वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 1:10 PM
प्रचारासाठी उरले फक्त ३ दिवस
ठळक मुद्देप्रशासनाकडे तत्काळ तक्रार करा-आयुक्तगल्लीदादांनी गोळा केले निवडणूक कार्ड