खडकदेवळा, ता.पाचोरा : तालुक्यातील गोराडखेडा येथे हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेला जालिंदरनाथ महाराजांचा यात्रोत्सव मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्येला म्हणजेच २६ रोजी होत आहे. यानिमित्ताने गावात तयारी करण्यात आली असून उत्साहाचे वातावरण आहे.गोराडखेडा हे गाव पाचोरा शहरापासून अवघ्या ३ किमी अंतरावर आहे. गावातील धार्मिक वृत्ती व परंपरा या कमालीच्या आहेत. त्यामुळे गावाने परिसरात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. तीन ते साडेतीन हजार लोकसंख्येच्या या गावाची ओळख जेवढे पैलवानांचे गाव म्हणून आहे त्यापेक्षा अधिक जालिंदरनाथ महाराजांच्या (जलालशहा बाबांच्या दर्ग्यामुळे) मंदिरामुळे आहे. समस्या दूर करून सुख-समृद्धी देणारा हा दर्गा भाविकांचे श्रद्धास्थान बनला आहे.तीनशे वर्षांची परंपराहिंदू-मुस्लीम भाविकांना एकत्र आणणारा जलालशहा बाबांचा यात्रोत्सव साधारण तीनशे वर्षांपासून साजरा करण्यात येत आहे. हिंदू बांधव मुस्लिमांच्या तर मुस्लीम बांधव हिंदूंच्या नवसात सहभागी होतात व प्रसादाचे जेवण करतात. यात्रेच्या पूर्वसंध्येला गोराडखेडा बुद्रूक व खुर्द येथे संदल मिरवणूक काढण्यात येते.यामध्ये बहुसंख्येने भाविक सहभागी होत दर्ग्यावर शाल चढवतात. यात मोठ्या संख्येने हिंदू-मुस्लिम भाविक सहभागी होतात.
कुस्त्यांची दंगलगोराडखेडा गावाची पैलवानांचे गाव म्हणून सर्वत्र ख्याती आहे. येथे तरुण आजही दंड-बैठका, कुस्ती पकड असे व्यायाम करत असतात. गावातील जुने पहेलवान तरुणांना कुस्तीचे प्रशिक्षण देतात व मार्गदर्शन करतात. त्यामुळे ही आवड येथे जोपासली जात आहे. यात्रेच्या दुस-या दिवशी कुस्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असते. प्रसंगी विविध जिल्ह्यातून पहिलवान कुस्ती खेळण्यासाठी येत असतात.