‘क्रेडाई वूमन विंग’तर्फे केसी पार्क परिसरात वृक्षारोपण
जळगाव - क्रेडाई वूमन विंगतर्फे शहरातील कानळदा रोड परिसरातील केसी पार्क भागात सोमवारी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी व नगरसेवक दिलीप पोकळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ‘क्रेडाई’ जळगावचे माजी अध्यक्ष प्रवीण खडके यांनी यांनी सर्व वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘क्रेडाई’ तर्फे ५०० वृक्ष लागवडीचा संकल्प हाती घेतला आहे. याच्या पहिल्या टप्प्याचा प्रारंभ करण्यात आला. ‘क्रेडाई’चे अध्यक्ष हातीम, सचिव दीपक सराफ, ‘क्रेडाई’ महाराष्ट्चे अनिश शहा, ‘क्रेडाई’ वूमन विंगच्या समन्वयिका आर्किटेक्ट सुचिता चौधरी, यामिनी शहा, निकिता खडके, रूपाली चौधरी आदी उपस्थित होते.
वन्यजीव संस्थेतर्फे ९३ सापांना जीवदान
जळगाव - पावसाळा सुरू झाला असल्यामुळे सध्या मानवी वस्तीत सापांचा संचार वाढला आहे. अशात वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सर्पमित्रांनी गेल्या दीड महिन्यात शहरातून तब्बल ९३ विषारी सर्प रेस्क्यू केले. मण्यार, घोणस, नाग हे प्रमुख विषारी साप रेस्क्यू करण्यात आले. यातील २८ मण्यार आणि १४ घोणस हे मानवी वस्तीत, घरात, अंगणात आढळून आले आहेत.
आव्हाण्यात पेट्रोलचोरांचा सुळसुळाट
जळगाव - तालुक्यातील आव्हाणे येथे घरफोडीची घटना ताजी असतानाच आता गावात पेट्रोल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दररोज गावातील २० हून अधिक मोटारसायकलमधून पेट्रोल चोरीला जात असल्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण असून, रात्रीच्या वेळेस नागरिक चोरांच्या धाकाने गाडीमधील पेट्रोल काढून बाटलीमध्ये जमा करून घेत आहेत. पेट्रोलचे भाव वाढल्यामुळे या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
बायपासच्या कामाचा कच्चा पुल पुन्हा केला तयार
जळगाव - राष्ट्रीय महामार्गाच्या बायपासचे काम वेगात सुरु असून, गिरणा नदीवर तयार होणाऱ्या पुलाचे काम देखील रात्रंदिवस सुरु आहे. याठिकाणी कामासाठी ठेकेदाराकडून तयार करण्यात आलेला कच्चा पुल तीनवेळा नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेला होता. आता ठेकेदाराने पुन्हा हा पुल तयार केला असून, पुलाचे खांब तयार करण्याचे कामाला वेग आला आहे.