जामनेर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे मुक्ताईनगर -जामनेर -पहूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरु आहे. र ठेकेदाराच्या बेपर्वाईने रस्त्याची दुर्दशा झाल्याने तीन महिन्यात चार जणांचे बळी या रस्त्यावर गेले. रविवारी झालेल्या अपघातात रस्त्याचे काम करणाऱ्या डंपर खाली एकाचा दुदैर्वी मृत्यू झाला.ठेकेदाराने रस्ता दोन्ही बाजूनी खोदून ठेवल्याने वाहन चालविणे जिकिरीचे झाले आहे. दुचाकी चालविणेही एक मोठी कसरतच ठरत आहे. रस्त्याचे काम सुरु असताना काही दिवसांपूर्वी पिंपळगाव गोलाईत जवळ पाण्याच्या टँकरखाली सापडून दोन कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांनी रस्ता रोको केले होते. त्यानंतर दुचाकीवर जाणाºया एकाचा बळी या रस्त्याने घेतला असून रविारीचा एकाचा असे आतापर्यंत चार बळी गेले आहेत.याचबरोबर जामनेर येथून पुणे जाणारी खाजगी लक्झरी बस टाकळी गावाजवळ पलटी झाल्याने १३ प्रवासी जखमी झाले होते. वारंवार होत असलेल्या अपघाताकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने ठेकेदाराचे फावत असल्याचे बोलले जात आहे.पावसाळ्यात रस्त्याची अधिकच दुर्दशा झाली असून काम धिम्यागतीने सुरु असल्याने वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.गेल्या दीड वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरु आहे. या आठवड्यात झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. वाहन पुढे नेताना चालकांना कसरत करावी लागत आहे. रविवारी झालेल्या अपघातानंतर रस्त्याचे काम करणारे मजूर व ठेकेदार काम बंद करून निघून गेले. पोलीस प्रशासनाने अपघातास कारणीभूत ठरलेल्या संबांधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी वाहन धारकांकडून होत आहे.औरंगाबाद , पुणे जाण्यासाठी जामनेर मार्गे कमी अंतर व वेळ लागत असल्याने वाहनधारक जळगाव ऐवजी जामनेरमार्गेच जाणे पसंत करतात. भुसावळ येथून जामनेर मार्गे औरंगाबाद, जालना व पुणे जाणाºया बसेस ची संख्या जास्त आहे. मात्र जामनेर ते वाकोद रस्ता खराब झाल्याने एसटी चालक या मार्गावर गाडी नेण्यास नाराज असतात.
जामनेर - पहूर रस्ता बनला मृत्यूचा सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 6:10 PM