फत्तेपूर ता. जामनेर : येथून जवळच असलेल्या मादणी येथील सेवानिवृत्त शिक्षक भागवत तुळशीराम पाटील यांच्या शेतातील तीन एकरातील ऊस जळून खाक झाला.पाटील यांनी गट नंबर ४ मध्ये १ हे. २३ आर क्षेत्रात ऊसाची लागवड केली आहे. एका साखर कारखान्यातर्फे ५ पासून ऊसाची तोडनीसुद्धा सुरु झालेली आहे. परंतु मंगळवारी रात्री साधारण १० ते ११ वाजेच्या सुमारास जोरदार वारा सुटला व ऊसाच्या शेतामधून गेलेल्या वीज वाहिनीच्या तारा एकमेकांवर घासल्याने त्या मधून पडलेल्या ठिणग्यांनी ऊसाने पेट घेतला व क्षणार्धात मोठा भडका उडाला. यात ७५ टक्के ऊस जळून खाक झाला. भागवत पाटील यांनी याबाबत माहिती दिल्यानंतर तलाठी, कृषी अधिकारी, ग्रामसेवक, पोलीस, तसेच वीज वितरण कंपनीचे अभियंता व सरपंच यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दोन लाख साठ हजार रुपये किंमतीचा ऊस जळल्याचा पंचनामा करण्यात आला. या बाबत पाटील यांनी वीज वितरण कंपनीला या लोंबकळत असलेल्या वीज वाहिनी बाबत वेळोवेळी सूचीत करूनही वीज वितरण कंपनीने या कडे दुर्लक्ष केले असे पाटील यांनी सांगितले.
जामनेर तालुक्यात तीन एकरातील ऊस जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 11:47 PM