मोहन सारस्वतजामनेर (जि. जळगाव) : जिल्ह्याच्या अनेक भागात रविवारी सायंकाळी पावसाने धुमाकूळ घातला. जामनेर शहरात रविवारी सायंकाळी ७:३० वाजता अचानक जोरदार वादळासह गारांचा पाऊस झाला. वादळाच्या तडाख्याने रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली. व्यापारी संकुलासमोर लावलेल्या दुचाकी वाऱ्याच्या वेगाने फेकल्या गेल्या. रस्त्यांवर गारांचा खच साचला होता. वेगवेगळ्या घटनेत १० ते १५ जण जखमी झाले. सोनाळा फाटा येथील एका शेतातील अनेक शेळ्या गारपीटीमुळे ठार झाल्या आहेत.
सायंकाळी देऊळगांव गुजरी, फत्तेपूर, वाकडी, शहापूर भागात जोरदार पाऊस झाला. सलग पाचव्या दिवशी वळवाचा तालुक्यात कहर सुरुच होता. जामनेरपुरा भागात वादळामुळे रिक्षा उडून जवळच्या नाल्यात पडली. सोनबर्डी टेकडीवरुन खाली उतरत असलेली रिक्षा वादळामुळे उलटली. यात ३ जण जखमी झाले. उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरणासाठी बनविलेले पत्र्याचे शेड उडाले, सुदैवाने कुणीही जखमी नाही. बिस्मील्ला नगर, शास्त्रीनगरसह इतर भागातील सुमारे ६० घरांवरील पत्रे उडाल्याचे सांगण्यात आले.
पहूर ता. जामनेर येथे पेट्रोल पंपाचे छत कोसळले आहे. यात एक दुचाकी दाबली गेली. कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने मोठी जीवितहानी टळली आहे. चांगदेव ता. मुक्ताईनगर येथे रविवारी रात्री आठच्या सुमारास आलेल्या तुफानी वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे चांगदेव परिसरात अवघ्या दहा मिनिटात होत्याचे नव्हते झाले.