मोहन सारस्वत
जामनेर (जि. जळगाव) : पालकांनी स्वतःच्या अल्पवयीन मुलीचे लग्न जवळच्या नात्यातील मुलाशी लावून दिले. यानंतर ही अल्पवयीन तरुणी गर्भवती राहिल्याने पतीविरुद्ध अत्याचार व पोक्सो कायद्यांतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील एका तरुणीचा विवाह झाला. त्यावेळी ती अल्पवयीन होती. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही आई-वडिलांनी तिचे लग्न लावून दिले. सुरुवातीचे काही दिवस दोघेही गावाकडेच राहत होते. नंतर दोघे पुणे येथे कामानिमित्त स्थलांतरित झाले.
असा झाला उलगडाविवाहिता गर्भवती असल्याने ती तपासणीसाठी पुणे येथील एका रुग्णालयात गेली असता अल्पवयीन असतानाच तिला गर्भधारणा झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. रुग्णालयानेच ही माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी जामनेर पोलिसांनी रविवारी पतीविरुद्ध बलात्कार व पोक्सो कायद्यांतर्गत व पालकांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार जामनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक सागर काळे तपास करीत आहेत.